⚡सावंतवाडी ता.०४सहदेव राऊळ-: आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल येथे दोन दिवसीय योग मार्गदर्शन शिबीर पार पडले.
शाळेतील विद्यार्थ्यांना खास करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेत एकाग्रता वाढावी यासाठी संस्थेचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते अर्जुन (तात्या) मुळीक यांच्या वतीने हे दोन दिवसीय योग शिबीर प्रशालेच्या अर्जुन सावंत सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शक विद्याधर पाटणकर, मुख्याध्यापक अनिल नाईक, नाना मुळीक, अर्जुन मुळीक, सचिन मडुरकर, उल्हास मुळीक, एकनाथ मुळीक, सुरेश मुळीक व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात योगाचे किती महत्व आहे, याचे प्रात्यक्षिक योगाद्वारे विद्याधर पाटणकर यांनी दाखविले. तसेच योगाद्वारे जीवनात ताणतणाव कमी कसा केला जाईल याबाबत मार्गदर्शन केले. दोन दिवस झालेल्या या शिबिरात विद्यार्थ्यानी आपल्या मनातील प्रश्न तसेच योगा बद्धल माहिती करून घेतली. तात्या मुळीक यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना योगाबद्धल मार्गदर्शन मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच आपण आतापर्यंत बऱ्याच प्रमाणात या योगा द्वारे विनामूल्य असे मार्गदर्शन सर्वांना देत असून, त्याचा आनंद ,अनुभव वेगळाच असल्याचे त्यांनी सांगितले आणि ह्यापुढेही आपण हे कार्य सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शाळा व उपस्थित सदस्यांच्या वतीने पाटणकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल नाईक यांनी तर आभार तात्या मुळीक यांनी मानले. यावेळी सर्व विध्यार्थ्यांना तात्या मुळीक यांनी दूध व खाऊचे वाटप केले.
