पुन्हा सेवेत घेण्यासाठी केला ठिय्या: अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले…
⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: सेवेतून कार्यमुक्त केलेल्या सर्व अंगणवाडी मदतनिसांना तात्काळ कामावर हजर करून घ्या. या मागणीसाठी आज अंगणवाडी कर्मचाऱ्यानी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन छेडले.
अंगणवाडी कर्मचारी सभा जनरल सेक्रेटरी कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करत अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातून अंगणवाडी कर्मचारी यांचा संप झाला तो शासन आणि कृती समिती यांच्यात २५ जानेवारीला झालेल्या वाट्याघाटीतून संपला. त्यातील एक अशी होती की, संपकालीन सर्व कारवाया रद्द होतील. इतर सर्व जिल्ह्यात ही अट पाळुन नव्या व जुन्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेल्या मागे घेतल्या. तसेच कार्यमुक्त केलेल्या अशा सर्व कर्मचाऱ्यांना कामावर विनाअट रुजू करून घेतले गेले. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यमुक्त केलेल्या मदतनिसाना अपील केल्याशिवाय व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ते मान्य केल्याशिवाय हजर होण्यास प्रतिबंध केला जात आहे. हे अन्यायकारक आहे. कार्यमुक्त करण्यात आलेल्या अंगणवाडी मदतनीस केवळ संपात सहभागी झाल्या याशिवाय कोणतीही चुकीचे कृत्य त्यांच्याकडून घडलेले नाही .त्यानंतर त्यांनी २६ जानेवारी पासून अंगणवाडीत हजर राहून आपण हजर असल्याबाबतचे फोटो सुपरवायझर ना पाठवले व हजर रिपोर्ट पाठवले. तरी त्यांच्या सुपर वायजरना नोटीसा पाठवून मदतनिसांना हजर करून घेतले तर तुमच्यावर कारवाई केली जाईल. अशा नोटिसा सुपरवायझर याना पाठविण्यात आल्या. त्या चुकीच्या आहेत. त्यामुळे अन्याय झालेल्या सर्व मदतनिसांना तात्काळ कामावर हजर करून घ्या. अशी आमची मागणी आहे. आणि या मागणीसाठी आज जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून विनाअट सर्व कर्मचाऱ्यांना हजर करून घेण्याचे लेखी आदेश द्या. संपाच्या संबंधित सर्व नोटिसा देणे बंद करा. तसेच २६ जानेवारी पासून कार्यमुक्त मदतनीस कामावर हजर झाले असल्याने त्यांचे २६ जानेवारी पासूनचे मानधन मिळाले पाहिजे. अशी मागणी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
