मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर:सिंधुदुर्गनगरी येथे रस्ते सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ..
ओरोस ता.१७-:कोविड महामारीच्या वेळी देशात आपण सर्वचजण उपाययोजना करीत होतो. योग्य खबरदारी घेत होतो. परंतु या महामारीत गेलेले बळी व देशात रस्ते अपघातात जाणाऱ्या बळींची तुलना केल्यास अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महामारीपेक्षा रस्ते अपघात भयंकर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा याचे प्रमाण खूप आहे. याला प्रशासन म्हणून आम्ही सुद्धा कमी पडलो आहोत. त्यामुळे हे रोखण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा रस्ता सुरक्षा अभियान शुभारंभ प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले.
१५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ आज सिंधुदुर्गनगरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथील पटांगणावर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर करण्यात आले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून नायर बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, जिल्हा शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, सिंधुदुर्ग परिवहन विभाग विभाग नियंत्रक अभिजित पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर, महामार्ग पोलीस निरीक्षक सावंत, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे केतन पाटील आदी उपस्थित होते.
