अन युरोपियन म्हणाला ‘रोड इज बॅड’…

मडुऱ्यात पर्यटकांना अपघात : रिक्षाचालक धावला मदतीला..

⚡बांदा ता.११-: मडुऱ्यातून बांद्याच्या दिशेने जाणाऱ्या एका युरोपियन दाम्पत्याचा व पाच वर्षीय मुलीचा मडुरा येथे दुचाकी घसरून अपघात झाला. यात चालकाच्या डाव्या हाताला व पायाला दुखापत झाली. तर पत्नीच्या उजव्या पायाला मार बसला. सुदैवाने पाच वर्षीय त्यांच्या मुलीला कोणतीही इजा झाली नाही. मात्र त्या युरोपियन पर्यटकाने रस्त्याच्या कामकाजावर बोलत ‘रोड इज बॅड’ असे म्हटले.


बांदा-शिरोडा मार्गावरील मडुरा येथे सुरू असलेले रस्त्याचे काम अनेक वेळा चर्चेचा विषय ठरला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास बांद्याच्या दिशेने जाणारे युरोपियन पर्यटक दांपत्य मॅक्सिन स्टेपांझुक(वय 35), अलींना केंजझेवा(वय 30), मिचेल स्टेपांझुक(वय 5, सर्व युरोप-एस्टोनिया, सध्या रा. गोवा) हे मडुरा हायस्कूल जवळ पोहोचताच त्यांची दुचाकी घसरली. त्यांना जखमी अवस्थेत पाहून बाजूला असलेले दुकानदार प्रभू मातोंडकर यांनी शिक्षकांना साद घातली. मुख्याध्यापक श्री. वराडकर व शिक्षक एस. सावंत यांनी त्या अपघातग्रस्त दाम्पत्यास सावरले. वेळ प्रसंगाला नेहमी धावणारे रिक्षा चालक विजय वालावलकर तात्काळ घटनास्थळी दाखल होत सदर दांपत्याला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी नेले. डॉ. मयुरेश पटवर्धन यांनी उपचार करून त्यांना पाठविले. मात्र त्या सदर अपघातग्रस्त दांपत्याने रस्त्याला पाहून ‘रोड इज बॅड’ असे म्हटल्याचे श्री. वालावलकर यांनी सांगितले.
तात्काळ कार्पेटचे काम करा
मडुरा शेर्ले रस्त्याचे खडीकरण करून अनेक दिवस उलटले, मात्र अद्याप त्यावर कार्पेटचे काम करण्यात आले नाही. परिणामी अशा लहान मोठ्या अपघातांना वाहन चालक सामोरे जात आहे.
परदेशात पोहचणार वेगळी माहिती
गोवा राज्य जवळ असल्यामुळे या भागात पर्यटकांची ये-जा असते. सदर अपघातग्रस्त पर्यटकाने खडीकरण केलेल्या रस्त्याबाबत ‘रोड इज बॅड’ म्हटले. त्यामुळे आपल्या देशातील रस्त्याबाबत परदेशात वेगळी माहिती पोहोचेल. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेत खडीकरणावर कार्पेटचे काम लवकर करावे अशी मागणी मडुरा माजी उपसरपंच विजय वालावलकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page