कुडाळ, प्रतिनिधी
प्रशासनाकडून अनधिकृत वाळू साठ्यांवर कारवाई करण्यात येते. या जप्त वाळू साठ्यांचे लिलाव तहसीलदार यांच्या मार्फत घेतले जातात. कुडाळ तालुक्यातील अशा जप्त साठ्यांचे लिलाव प्रथम २१ डिसेंबर २०२३ रोजी लावण्यात आला होता. मात्र, लिलावास कोणाचीही उपस्थिती नव्हती. त्यामुळे २९ डिसेंबर रोजी पुन्हा या जप्त साठ्यांचा लिलाव करण्यात आला. या लिलावात अंदाजे ११७७ ब्रास वाळू साठा लिलावाद्वारे घेण्यासाठी ३ लिलावधारकांनी सहभाग घेतला होता. यात कुडाळ उद्यमनगर येथील नित्यानंद शिरसाठ यांनी प्रती ब्रास ६६० रू. या दराने हा वाळूसाठा विकत घेतला. त्यामुळे कुडाळ तालुक्यातील वाळू विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. सदरचा वाळू साठ्याची मौजे गाव कुटगाव आणि एमआयडीसी कुडाळ येथील मिळकतीवरून विक्री आणि वाहतूक करण्यासाठी ४ जानेवारी २०२४ ते ३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत करण्याची परवानगी देण्यात आल्याची लेखी माहिती कुडाळ तहसीलदार यांनी दिली आहे.
