स्पर्धा परीक्षेत झोकुन द्या आणि आपले करिअर घडवा…

फोंडाघाटमध्ये महाविद्यालयात
पोलीस निरीक्षक रिझवाना नदाफ यांचे प्रतिपादन..

⚡कणकवली ता.०३-: कायद्याची माहिती प्रत्येकाला असली पाहिजे. कायद्याची माहिती हीच कायद्याची पाळणूक असते. आजकाल ऐकण्याची सवय नसली तरी आपल्या फायद्याचे ऐकले पाहिजे. हे आपल्याला हिताचे असते. स्वसंरक्षण गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला व्यायामाची आवश्यकता असते. चित्रपट पाहून मन भरकटवून घेऊ नका. मोबाईल सारख्या गोष्टीतून क्षणिक सुखासाठी जीवन बरबाद करणारी पिढी निर्माण झाली आहे. करिअर घडवण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी योग्य वेळेची वाट बघा. स्पर्धा परीक्षेत झोकुन द्या आणि आपले करिअर घडवा असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी केले.

त्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये महाविद्यालयाच्या एनएसएस विभागामार्फत पोलीस स्थापना दिन साजरा करण्यात आला त्या प्रसंगी बोलत होत्या.दरम्यान यावेळी व्यासपीठावर वाहतूक शाखेचे हेडकॉन्स्टेबल प्रकाश गवस, आशीष जाधव, सुनील निकम, फोंडाघाट पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सावंत, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत , प्रा.डॉ. बालाजी सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना फोंडाघाट पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सावंत म्हणाले की, “सदरक्षणाय खलनिग्रहणय” असे पोलीस दलाचे ब्रीद वाक्य असून याचा अर्थ सज्जनाच्या रक्षणासाठी आणि दुर्जनावर नियंत्रण मिळवून त्याचा नयनाट करण्यासाठी पोलीस खाते कटीबद्ध आहे. यामुळे पोलीस दल ऊन, पाऊस,किंवा थंडी तसेच दिवस रात्र याची तमा न बाळगता आपल्या रक्षणासाठीच असतात त्यांच्यामुळे देशांतर्गत कायदा सुव्यवस्था आबाधित राहते. आज 62 वा वर्धापन दिन साजरा करताना कायदा सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी पोलीस दला समोर निरनिराळी आव्हाने उभी आहेत मात्र पोलीस दलातील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी आपापली कर्तव्य पार पाडत नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचे काम चोख बजावत आहेत्.
वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल प्रकाश गवस म्हणाले, प्रत्येक नागरिकाची नजर ही पोलिसी असली पाहिजे. याचा अर्थ असा की प्रत्येक सिविल ड्रेस मधला माणूस हा पोलिसच असतो. संशयास्पद गोष्टीची माहिती आपण पोलीस यंत्रणेला दिली पाहिजे. एखादा गुन्हेगार आपल्यामुळे सापडला तर पोलीस यंत्रणाला यंत्रणेला सहकारी मिळेल.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत म्हणाले की पोलीस हे मित्र आहेत हे या मान्यवरांच्या वक्तव्यातून अधोरेखित झाले. एक महिला अधिकारी आपले कर्तव्य बजावताना सावित्रीमाईचा आदर्श ठेवून आपली शिकण्याची जिद्द दाखवून देते हे अभिमानास्पद आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी सुरवसे यांनी मानले तर आभार प्रा. संतोष आखाडे यांनी मानले.

You cannot copy content of this page