⚡वेंगुर्ला ता.२८-: आरवली सोन्सुरे येथील सामाईक घराच्या अंगणात चारचाकी गाडी लावल्याच्या कारणावरुन धक्काबुकी होत झालेल्या मारहाणीत मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयीत आरोपिंची ओरोस येथील जिल्हा न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आरवली सोन्सुरे येथील सामाईक घराच्या अंगणात चारचाकी गाडी लावल्याच्या कारणांवरुन १७ डिसेंबर रोजी कावळे कुटुंबामध्ये शिवीगाळ होवून, धक्काबुकी होवून हाताच्या थापटांने झालेल्या मारहाणीत नारायण महादेव कावळे हे मृत झाले, असा आरोप कृष्णा नारायण कावळे, कांचन कृष्णा कावळे, सुहास सुमंत कावळे व श्री समिक्षा सुहास कावळे यांच्यावर करण्यात आला होता. या कामातील संशयीत आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करत वेंगुर्ला पोलिसांनी अटक करत त्यांना २२ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती होती.
वरील संशयीत आरोपी यांनी ओरोस येथील सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी जामीन अर्ज दाखल केला होता. ओरोस न्यायालयाने 30 हजार रुपयांच्या जामीनावर संशयीत आरोपिंची अटी व शर्तीसह मुक्तता केली. संशयित आरोपीतर्फे अँड. संग्राम देसाई, अँड.सागर ठाकुर, अँड. राहूल पै यांनी काम पाहीले.
