मालवण ग्रामीण रुग्णालयातील समस्यांबाबत मंदार केणी यांनी छेडले उपोषण…

आरोग्य विभागाच्य अधिकाऱ्यांना धरले धारेवर: आश्वासनाअंती केणी यांनी उपोषण घेतले मागे…

⚡मालवण ता.२७-: मालवण ग्रामीण रुग्णालयातील बंद ऑपरेशन थिएटर, स्त्रीरोग तज्ज्ञ नसणे, भुलतज्ज्ञ नसणे, नेत्र तपासणी न होणे रक्त तपासणी अहवाल न मिळणे अशा विविध समस्यांबाबत मालवणचे माजी नगरसेवक मंदार केणी यांनी आज आक्रमक भुमीका घेत ग्रामीण रुग्णालयासमोर आमरण उपोषणास छेडले. केणी यांच्या उपोषणाला ठाकरे शिवसेनेने जाहीर पाठिंबा देत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

दरम्यान, या उपोषण स्थळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी सुबोध इंगळे यांनी भेट देत ऑपरेशन थिएटर लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, स्त्रीरोग तज्ज्ञ दोन महिन्यात दाखल होतील आणि कर्मचाऱ्यांना सौजन्याची वागणूक देण्याचे निर्देश देण्यात येतील असे आश्वासन श्री. केणी यांनी दिल्याने केणी यांनी चार तासानंतर आपले उपोषण मागे घेतले. यावेळी जनरल सर्जन डॉ. एस. एस. लिहितकर यांना दर सोमवार व मंगळवारी मालवण येथे प्रतिनियुक्तीने देण्यात आल्याचे पत्र श्री. केणी यांना यावेळी देण्यात आले.

मालवण ग्रामीण रूग्णालयाला अनेक समस्यांनी ग्रासले असून यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड आणि याबाबत वारंवार तक्रारी करूनही आरोग्य विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ आज सकाळी मंदार केणी यांनी ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात उपोषण सुरू केले. या उपोषणात शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, भाई कासवकर, महेश जावकर, सिद्धेश मांजरेकर, राजू इभ्रामपूरकर, रजनी कोळंबकर, संतोष कोळंबकर, भालचंद्र चव्हाण, शशिकांत खोत, राजेंद्र खोत, किरण शिर्सेकर, सुरेश मडये, उमेश हडकर, विनोद करंगुटकर, विजय खडपकर, सिद्धार्थ मडये, चंद्रशेखर मडये, मनोज धुरी, सिद्धेश कोळंबकर, विरेंद्र पाटील, रुमित मालवणकर, विद्याधर मडये, निनाक्षी मेतर, सौ. दिपाली शिंदे, बंडया सरमळकर, यतिन झाड, गणेश गोसावी, किरण हिर्लेकर यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी मंदार केणी म्हणाले, मालवण ग्रामीण रूग्णालयातील गैरसोयी बाबत आपण उपोषणास छेडले आहे. या रुग्णालयात रूग्ण दाखल झाल्यानंतर त्याला ओरोसला पाठविण्याची कार्यवाही केली जाते, याठिकाणी कार्यरत असणारा कर्मचारी वर्गही रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सौजन्याची वागणूक देत नाहीत, असा आरोपमंदार केणी यांनी केला. नेत्रतपासणी करण्यासाठी याठिकाणी कोणीही तज्ञ येत नसल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. फिटनेस चाचणीसाठी ओरोसला पाठविण्यात आल्याने त्याठिकाणीही रूग्णांचे हाल होत आहेत. ऑपरेशन थिएटर असूनही त्यावर कार्यवाही होत नाही. नौसेना दिना वेळी पंतप्रधान येणार म्हणून रुग्णालयाची रंगरंगोटी करून परिसर सुशोभीकरण करण्यात आले. मात्र रुग्णालयातील सेवा सुविधाबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्यानेच आपण उपोषणास छेडले आहे, असेही मंदार केणी म्हणाले.

यावेळी उपोषणास स्थळी हजर झालेल्या जिल्हा वैद्यकीय अधिकारी सुबोध इंगळे यांनी केणी यांच्या मागण्याबाबत आश्वासन दिल्याने हे उपोषणास स्थगित करण्यात आले. मालवण ग्रामीण रूग्णालयासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ लवकरात लवकर देण्यात येईल असेही डॉ. इंगळे यांनी सांगत कर्मचारी वर्गाने रूग्णांशी आणि नातेवाईकांशी सौजन्यानेच वागले पाहिजे. यासाठी आवश्यक त्या सूचना व समज देण्यात येईल, असेही श्री. इंगळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page