नट वाचनालयात २० जानेवारीला नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधी
मुलांना आपल्या मनातील विचार इतरांना पटवून देण्याचे कौशल्य निर्माण व्हावे तसेच नेतृत्व गुण विकसित व्हावेत या उद्देशाने (कै.) शशिकांत शांताराम नाडकर्णी यांच्या कायमठेव देणगीतून त्यांचे वडील (कै.) शांताराम कमळाजी नाडकर्णी व आई (कै.) शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ येथील नट वाचनालयात शनिवार दिनांक २० जानेवारी रोजी “नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात स्पर्धा होणार आहे.


नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेचे हे एकोणीसावे वर्ष आहे. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील इ.५ वी ते ७ वी या प्राथमिक गटातून दोन स्पर्धक व इ.८वी ते १०वी या माध्यमिक गटातून दोन स्पर्धक सहभागी होऊ शकतात. प्राथमिक गटासाठी ‘माझे बालपण’, ‘माझे गुरू’ हे विषय असून वेळ ४ मिनिटे आहे. माध्यमिक गटासाठी ‘माझे कुटुंब व मोबाईल’, ‘स्त्रीची महती’ हे विषय असून वेळ ५ मिनिटे आहे.
स्पर्धकाने कोणत्याही एका विषयावर वक्तृत्व सादर करावयाचे आहे. विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धक शाळांनी आपले अर्ज बुधवार दि.१७ जानेवारी २०२४ पूर्वी ग्रंथपाल, नट वाचनालय, बांदा यांच्याकडे द्यावेत. या स्पर्धेत आपल्या शाळेचे स्पर्धक पाठवून सदर स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन नट वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page