शासकीय तंत्रनिकेतन मालवणकडून ‘स्कूल कनेक्ट २१’ उपक्रम
*💫मालवण दि.१५-:* अभ्यासक्रम नोकरी व व्यवसाय संधींवर जागृती होण्याच्या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन मालवण कडून स्कूल कनेक्ट २१ हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील विविध शाळांमधील दहावीच्या व बारावीच्या विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाचे महत्व व फायदे आणि त्या अनुषंगाने उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या व व्यवसायाच्या संधी या बद्दल माहिती पर उपक्रम आयोजित केले जात आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांच्या संकल्पनेतून एम एस बी टी इ चे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सहसंचालक श्री प्रमोद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची समिती स्थापली असून डॉ. योगेश महाडिक व प्रा. दत्तप्रसाद गोलतकर समन्वयक म्हणून कामकाज पाहत आहेत. तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शंभर टक्के कॅपॅसिटी युटिलायझशन उपक्रमांतर्गत हा उपक्रम घेण्यात येत आहे. शासकीय अनुदानित विना अनुदानित इत्यादी महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. ज्या शाळांना प्रत्यक्ष भेट देता येणे शक्य नाही त्यांचे शाळेच्या मुख्याध्यापकांकडून मदत घेऊन ऑनलाईन स्वरूपात मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले जात आहे. याकरिता शिक्षणाधिकारी श्री अशोक कडूस यांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती प्रा. डॉ योगेश महाडिक यांनी दिली आहे.
