सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाच्या गस्ती नौकेला आडकाठी प्रकरण : मुरारी भालेकर यांनी केली तक्रार
*💫मालवण दि.१५-:* सिंधुदुर्गच्या समुद्रात बेकायदेशीर मच्छीमारी करणाऱ्या परराज्यातील ट्रॉलर्सवर कारवाई करण्यास गेलेल्या सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाच्या गस्ती नौकेला आडकाठी केल्याप्रकरणी परराज्यातील त्या सहाही ट्रॉलर्स विरोधात वेंगुर्ला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयाचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी रीतसर तक्रार दाखल केली आहे. वेंगुर्ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवणच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाची शीतल नामक गस्तीनौका १४ मार्च रोजी मालवण ते रेडी या सागरी क्षेत्रात गस्त घालत असताना पहाटे २ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परराज्यातील ३० ते ३५ ट्रॉलर्स बेकायदेशीर रित्या मच्छीमारी करीत असल्याचे गस्तीनौकेवरील परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांना आढळून आले. त्यांनी या बोटींपैकी रिद्धी सिद्धी नामक बोटीवरील तांडेलाकडे कागदपत्रांची मागणी केल्यावर त्या बोटीने तिथून पळ काढला. हा पळ काढत असताना त्या ट्रॉलरने आपल्या इतर सहकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर शीतल या गस्तीनौकेला रिद्धी सिद्धी, कार्तिक किशोर, पवनपुत्र, प्रियदर्शनी, शुभम, भाग्यलक्ष्मी या बोटींनी घेरले. व कारवाई करण्यास मज्जाव केला. त्यामुळे शीतल गस्तीनौका ही कारवाई न करताच माघारी परतली. परराज्यातील ट्रॉलर्सनी कारवाई करण्यास आडकाठी केल्याने याबाबत त्या सहाही ट्रॉलर विरोधात वेंगुर्ला पोलीस स्थानकात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
