संरक्षणमंत्री राजनाथ सिंह:तारकर्ली नौदल दिन कार्यक्रमात व्यक्त केली भावना..
मालवण दि प्रतिनिधी
जागतिक महासत्ता होण्यासाठी सशक्त नौदल असणे आवश्यक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलावर विशेष लक्ष दिल्याचे प्रतिपादन देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मालवण तारकर्ली येथे नौदल दिन कार्यक्रमात बोलताना केले.
तारकर्ली येथे नौदल दिन कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संबोधित करत नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, विधानपरिषद अध्यक्षा निलम गोऱ्हे, खासदार विनायक राऊत, मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.
यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी नौदल दिन कार्यक्रमास आले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढविली त्यासाठी त्यांचे आभार. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण हे पंतप्रधानांच्या हस्ते झाले हा आमच्यासाठी सौभाग्याचा क्षण आहे. दूरदृष्टी असणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. नौदलाचे महत्व ओळखून त्यांनी आरमाराची स्थापना केली. आज त्यांचेच विचार आचरणात आणून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करीत आहेत. जागतिक महासत्ता होण्यासाठी सशक्त नौदल असणे आवश्यक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलावर विशेष लक्ष दिले आहे. पहिल्यांदा आपण बोटिंसाठी लागणारे साहित्य हे बाहेरून आयात करायचो परंतु गेल्या काही वर्षात बोटिंसाठी लागणारे साहित्य आपल्या देशात बनवू लागलो, असे यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
यावेळी भारतीय नौसेनेचे प्रमुख अँडमिरल आर. हरी कुमार म्हणाले, भारताची सुरक्षा, राष्ट्र निर्माण व आत्मनिर्भरतेसाठी नौसेना सदैव तत्पर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या भूमीत गनिमी कावा अवलंबून स्वराज्य निर्माण केले. त्याच भूमीत नौदल दिन साजरा होत आहे. नौदल समर्पित भावनेने काम करत असून देशासाठी प्रत्येक क्षणी आणि प्राणपणाने तयार आहे, असेही ते म्हणाले.
