मुख्यमंत्री एकनाथ शिंदे:महाराजांनी भारताला आरमार दिल्याचे नौदल दिन कार्यक्रमात केले स्पष्ट
मालवण दि प्रतिनिधी
आत्मनिर्भर भारताचा वारसा हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिला असून तेच सर्जिकल स्ट्राईकचे जनक होते. महाराजांनी भारताला आरमार दिले आणि सिंधुदुर्ग किल्ला हे त्याचे ज्वलंत उदाहरणं आहे. नौदल दिनानिमित्त आज पूर्ण देश छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक होत आहे, देशाच्या समुद्री सुरक्षेत नौदल पराक्रम गाजवत असून आज कोकणच्या किनाऱ्यावर भारताच्या बलशाली नौदलाचे वैभव अवतरले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण तारकर्ली येथे नौदल दिन कार्यक्रमात बोलताना केले.
तारकर्ली येथे नौदल दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित करत नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, विधानपरिषद अध्यक्षा निलम गोऱ्हे, खासदार विनायक राऊत, मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवपराक्रमाने पावन झालेल्या भूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतो. राजस्थान छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मध्ये ऐतिहासिक विजय मिळविला त्याबद्दल अभिनंदन करतो. या देशात गॅरंटी चे दुसरे नाव नरेंद्र मोदी आहेत. देशाला जोडणारे पंतप्रधान महाराष्ट्राच्या भूमीवर आले आहेत, आम्हाला अभिमान वाटतो. यापूर्वी घर घर मोदी म्हटले जायचे, पण आता मन मन मोदी असे आहे. आज भारताच्या सामर्थ्याची नोंद जगाने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासत देशाचे नाव जगात करत आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले
