Headlines

एसआरएम कॉलेजने केला दांडी समुद्र किनारा स्वच्छ…

सागरी दिनाला प्राणीशास्त्र विभागाचा पुढाकार:सागरी जैवविविधततेबाबत जनजागृती..

⚡कुडाळ ता.०२-: येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक सागरी दिनानिमित्त दांडी बीच, मालवण येथे सागरी जैवविविधता संवर्धन महत्त्व या विषयावर जनजागृती आणि बीचवरील स्वच्छता करण्यात आली. यामध्ये प्राणीशास्त्र विभागाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
प्राणीशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. नानासाहेब कांबळे यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत ही जनजागृती व स्वच्छता मोहीम राबविली.
प्रा.डॉ. नानासाहेब कांबळे हे महाराष्ट्र जीन बँक व राज्य जैवविविधता मंडळ यांच्याकडून मंजूर झालेल्या, “ सिंधुदुर्ग जिल्ह्यात पकडल्या जाणाऱ्या सागरी मत्स्य जैवविविधतेचे मूल्यांकन व दस्तावेजीकरण” या विषयाच्या संशोधन प्रकल्पावर मुख्य संशोधक म्हणून काम करत आहेत. या प्रकल्पावर प्रकल्प सहयोगी म्हणून गुरुनाथ कदम आणि कु. नेहा कुबल हे काम करत आहेत. संशोधन कार्याचा भाग म्हणून, सागरी मत्स्य जैवविविधता संवर्धन करण्याच्या हेतूने ही जनजागृती आणि सागरी किनारा स्वच्छता कार्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी आणि दांडी बीच येथील स्थानिक रहिवासी व मच्छिमार अशा एकूण ४८ जणांनी भाग घेऊन जवळपास २५० किलो कचरा गोळा केला. काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, तुटलेली मासेमारीची जाळी,इत्यादी कचरा गोळा करून दांडी किनारा स्वच्छ केला व मालवण नगरपालिकेचे नगरसेवक महेश कोयंदे व त्यांच्या सहकार्याने या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट करण्यासाठी नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आला. जागतिक सागरी दिन म्हणून साजरा करताना जरी ही स्वच्छता करण्यात आली असली तरी सदैव किनारे स्वच्छ राखण्याची आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे याकडे प्रा.डॉ. नानासाहेब कांबळे यांनी लक्ष वेधले.

You cannot copy content of this page