भूखंडावरील स्थगिती उठली, गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द: उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित बैठक संपन्न..
⚡मुंबई, ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीतील भूखंड वाटप, उद्योगांना चालना आणि प्रलंबित समस्यांच्या निवारणासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात विशेष बैठक पार पडली. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या आग्रहानुसार आयोजित या बैठकीत आडाळी एमआयडीसीच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीत आडाळी एमआयडीसीतील भूखंडधारकांवरील स्थगिती उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भूखंडांचा ताबा, करार प्रक्रिया तसेच बांधकाम परवानग्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच नव्या उद्योजकांसाठी भूखंड वाटपाची ऑनलाइन प्रक्रिया पुढील दोन आठवड्यांत सुरू करण्यात येणार असून इच्छुक उद्योजकांना त्यामध्ये सहभागी होता येणार आहे.
यावेळी आडाळी एमआयडीसी परिसरातील प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्योगांना चालना मिळावी, गुंतवणूक वाढावी आणि नवीन उद्योजक आकर्षित व्हावेत यासाठी ऑगस्ट महिन्यात गोवा येथे गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्याचेही निश्चित करण्यात आले.
सिंधुदुर्गातील उद्योजकांची गैरसोय दूर करण्यासाठी एमआयडीसीच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी दर गुरुवारी आडाळी येथे उपलब्ध राहून उद्योजकांची कार्यालयीन कामे मार्गी लावतील, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
आडाळी एमआयडीसीतील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी इन्सुली-आडाळी पर्यायी ३३ केव्ही वीजवाहिनीचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. तसेच तिलारी पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा वापर करून डेटा सेंटरसारखे मोठे उद्योग उभारण्याच्या शक्यतेचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
याशिवाय आडाळी एमआयडीसीतील विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते, तर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाल्या होत्या.
बैठकीत आडाळी एमआयडीसीच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.
