सुमारे 9.47 लाखांचा मुद्देमाल हस्तगत: एक संशयित ताब्यात..
⚡बांदा, ता.०२-: बांदा चेकपोस्ट येथे गुरुवारी दुपारी सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूसह बोलेरो पिकअप जप्त केला. या कारवाईत एकूण ९ लाख ४७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी नाकाबंदी सुरू असताना एमएच ०७ एजे ५२०९ क्रमांकाच्या बोलेरो पिकअपची तपासणी केली. तपासणीत वाहनातून गोवा बनावटीच्या विविध ब्रँडची दारू आढळून आली. या प्रकरणी अमोल लक्ष्मण चिंदरकर (वय ३५, रा. कलमठ, ता. कणकवली) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईत ४ लाख ४७ हजार २४० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू तसेच ५ लाख रुपये किमतीचा बोलेरो पिकअप असा एकूण ९ लाख ४७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नवमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पालकर, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल परब यांनी केली. तसेच हेडकॉन्स्टेबल दादा परब, राजेश गवस व राकेश चव्हाण यांनी कारवाईस सहकार्य केले.
