नारायण राणें: पंतप्रधानांच्या कृत्याला जनतेने आशीर्वाद द्यावेत…
⚡मालवण ता.०४-: काल राज्याच्या निवडणुकीत जो भाजपने विजय मिळविला तो नऊ वर्षामध्ये पंतप्रधानांनी केलेल्या कामाचे प्रतीक आहे. आपला भारत देश आत्मनिर्भर व महासत्ता बनावा यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. या त्यांच्या कार्याला जनतेने आशीर्वाद द्यावेत व सहकार्य करावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवण तारकर्ली येथे नौदल दिन कार्यक्रमात बोलताना केले.
तारकर्ली येथे नौदल दिन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संबोधित करत नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, विधानपरिषद अध्यक्षा निलम गोऱ्हे, खासदार विनायक राऊत, मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास कथन करतानाच भारतीय नौसेनेने आजच्या आयोजित केलेल्या शिस्तबद्ध कार्यक्रमासाठी त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत असे सांगितले. तसेच चार राज्याच्या निवडणुकांचा निकाल काल लागला, यामध्ये तीन राज्यांच्या निवडणुका जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालवण मध्ये आलेले आहेत. जिथे जातील तिथे यश मिळवतील असेच पंतप्रधान मोदी आहेत आणि तसा त्यांचा पायगुण आहे. काल जो विजय मिळविला तो नऊ वर्षामध्ये पंतप्रधानांनी केलेले काम दाखवून दिले. आपला भारत देश आत्मनिर्भर व महासत्ता बनावा यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. या त्यांच्या कृत्याला जनतेने आशीर्वाद द्यावेत व सहकार्य करावे, असेही नारायण राणे म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे आगमन झाल्या नंतर भाजपा मालवण कुडाळ विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी स्वागत केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावन्त , उपाध्यक्ष अतुल काळसेकर व अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
