मालवण दि प्रतिनिधी :
बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उदात्त हेतूने शिक्षणमहर्षी एच. डी. गावकर यांनी ग्रामीण भागात शिक्षणसंस्थांची उभारणी केली. ते केवळ शिक्षणप्रेमी नव्हते, तर पर्यावरणप्रेमीही होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी वृक्षारोपण करून जयंती साजरी केली जाते. निसर्गावर प्रेम करण्याचा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन
श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय खोचरे यांनी येथे बोलताना केले
मालवण तालुक्यातील वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक शिक्षणमहर्षी स्वर्गीय एच. डी. गावकर यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त विद्यालय परिसरात वृक्षारोपण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी खोचरे हे बोलत होते यावेळी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी सहाय्यक शिक्षक नंदकिशोर डगरे यांनी एच. डी. गावकर यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव करताना त्यांच्या नेतृत्वगुणांचा आदर्श समाजाने घ्यावा आणि समाजजडणघडणीसाठी त्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमात दुर्वा झाड, मोहित अंधारी, कौस्तुभ पेडणेकर, रचना गोसावी, दिवाकर गोसावी आणि तन्मय देऊलकर या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक वृक्ष लावून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान दिले. या विद्यार्थ्यांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनाथ फणसेकर यांनी केले, तर आभार सहाय्यक शिक्षक प्रवीण कुबल यांनी मानले
यावेळी शिक्षक संभाजी कोरे, रामचंद्र गोसावी, रोहिणी दिघे, मिताली मोंडकर, यशवंत गावकर, दत्तात्रय गोसावी, शालेय पंतप्रधान वेद कुबल, उपपंतप्रधान वेदिका लुडबे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
