नगरपालिकेने कारवाई करण्याची स्थानिक महिलांची मागणी
⚡मालवण ता.०२-:
मालवण शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील रेवतळे – सागरी महामार्ग परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुत्र्यांकडून या परिसरातील पाळीव गुरे व वासरांवरही हल्ले होत असून यामुळे पशुधनाचे नुकसान होत असल्याने शेतकरी व पशुपालकांमध्येही भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी रेवतळे परिसरातील महिलांनी मालवणच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रेवतळे येथील महिलांनी आज मालवण नगरपालिकेत नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांची भेट घेऊन भटक्या कुत्र्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत निवेदन देऊन लक्ष वेधले. यावेळी अमृता फाटक, मीना फाटक, वेदिका गोसावी, मेधा मुरकर, दर्शना चव्हाण, प्राजक्ता हळदणकर, तारका चव्हाण, स्वाती बादेकर, मोहिनी हडकर, राखी हडकर, सीमा गावडे, दीपाली मांजरेकर, पूजा मांजरेकर, अपर्णा मडये आदी व इतर महिला उपस्थित होत्या.
मालवण नगरपालिका हद्दीतील रेवतळे सागरी महामार्ग परिसरात भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः शाळेत ये-जा करणारी लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वार व पादचारी यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भटके कुत्रे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या मागे धावणे, भुंकणे तसेच चावण्याचा प्रयत्न करणे अशा घटना वारंवार घडत आहेत. सागरी महामार्गावर सकाळच्या सत्रात जॉगिंगसाठी जाणारे ज्येष्ठ व तरुण नागरीक मनात भिती ठेवून वावरत आहेत. कुत्र्यांमुळे पालक आपल्या लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंताग्रस्त आहेत. तसेच भटके कुत्रे टोळक्याने एकत्र येऊन गुरांच्या लहान वासरांवर तसेच इतर पाळीव जनावरांवर हल्ले करत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पशुधनाचे नुकसान होत असून शेतकरी व पशुपालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
तसेच सागरी महामार्गावरही भटके कुत्रे अचानक रस्त्यावर येत असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून नगरपालिकेने याबाबत तातडीने गांभीर्याने लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण, पकडून नियमानुसार योग्य ठिकाणी स्थलांतर करणे तसेच नागरिकांच्या व पशुधनाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तात्काळ राबवाव्यात. भविष्यात कोणतीही अनुचित घटना, अपघात अथवा जीवितहानी होऊ नये तसेच पशुधनाचे नुकसान टाळण्यासाठी या निवेदनाची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास तसेच भटक्या कुत्र्यांमुळे पशुहानी किंवा मनुष्यहानी झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार नगरपालिका राहिल, असेही महिलांनी निवेदनात म्हटले आहे.
