गोवा–गणपतीपुळे पर्यटनाला मिळणार वेग:राजापूर-आडिवरे-पावसमार्गे गाठता येणार गणपतीपुळे..
⚡कुडाळ ता.१८-: गणपतीपुळे आणि गोवा ही दोन्ही लोकप्रिय पर्यटनस्थळे आता थेट बससेवेने जोडली गेली आहेत. कदंबा परिवहन महामंडळाने (KTCL) १५ ऑगस्ट २०२६ पासून पणजी ते गणपतीपुळे नवीन निम-आरामदायी (सेमी-लक्झरी) बससेवा सुरु केली आहे. गोवा आणि महाराष्ट्रातील धार्मिक व पर्यटनाच्या ठिकाणांना जोडण्यासाठी ही बस सुरू करण्यात आली असल्याने कोकणातील पर्यटनाला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या औचित्य साधून कदंबा परिवहन महामंडळाने (KTCL) या पणजी ते गणपतीपुळे नवीन निम-आरामदायी (सेमी-लक्झरी) बससेवेचे उद्घाटन केले आहे. पणजी स्थानकातून दुपारी १:१५ वाजता निघते तर गणपतीपुळे येथून सकाळी ७:३० वाजता सुटते. पणजी वरून जातेवेळी या बसला म्हापसा, पेडणे, बांदा, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, राजापूर, धारतळे, आडिवरे, पावस, रत्नागिरी, गणपतीपुळे असे थांबे आहेत.
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या गणपतीपुळे आणि गोवा या दोन प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणारी गणपतीपुळे-पणजी थेट बससेवा सुरु केल्यामुळे दोन महत्वाची पर्यटन ठिकाणे जोडली गेली आहेत. गोवा राज्य परिवहन महामंडळाच्या (कदंबा) माध्यमातून ही बससेवा सुरू करण्यात आली असून, त्यामुळे रत्नागिरीसह कोकणातील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
रत्नागिरी परिसरातून पणजीला जाण्यासाठी यापूर्वी थेट आणि पुरेशी बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना बस बदलण्याचा त्रास सहन करावा लागत होता. नव्या थेट बससेवेमुळे हा प्रवास अधिक सोयीचा झाला आहे. त्यामुळे रत्नागिरीसह कोकणातील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. रत्नागिरीला जाण्यासाठी हा जो मार्ग आहे तो निसर्ग संपन्न आहे. कोकणचे सौंदर्य, समुद्रकिनारे, नद्या, खाड्या, माडपोफळीच्या बागा यांचे दर्शन घेत प्रवास फार सुंदर होऊ शकतो.
या बससेवेमुळे विशेषतः गणपतीपुळे, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या भागातील प्रवाशांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पणजीवरून दुपारी १.१५ वाजता हि बस निघेल. म्हापसा १.४५, पेडणे २.२०, बांदा २.४५, सावंतवाडी ३.३०, कुडाळ ४.००, कणकवली ५.००, खारेपाटण ५.४५, राजापूर ७.००, धारतळे ७.४०, आडिवरे ७.५०, पावस ८.३०, रत्नागिरी ९.०० असं करून रात्री ९.४५ ते १० वाजेपर्यंत हि बस गणपतीपुळे येथे पोहोचते.
परतीच्या प्रवासात सकाळी ७.१५ वाजता गणपतीपुळे येथून हि बस सुटते. रत्नागिरी ८.३०, पावस ९.००, आडिवरे ९.४०, धारतळे ९.५०, राजापूर १०.३०, खारेपाटण ११.४५, कणकवली १२.३०, कुडाळ १.३०, सावंतवाडी २.००, बांदा २.४५ , पेडणे ३.१०, म्हापसा ३.४५ आणि पणजी बसस्थानकात सायंकाळी ४.१५ वाजता हि बस पोहोचणार आहे.
हि बस सुरु होण्यासाठी विजयदुर्गच्या अविनाश गोखले आणि सहकारी प्रवाशांनी फार पाठपुरावा केला होता. खरंतर राज्य परिवहन महामंडळाने सुद्धा मागणी असल्याने अशी बस सुरु करायला हरकत नव्हती. पण कदंबने यात बाजी मारली आणि हि बस सुरु झाली आहे. अलीकडेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नवीन निमआराम गाड्या कदंबच्या सेवेत दाखल झाल्या. त्या गाड्यांपैकीच या दोन गाड्या गणपतीपुळे बससेवेसाठी देण्यात आलेल्या आहेत.
या नव्या बससेवेचा रत्नागिरी, राजापूर तसेच संपूर्ण कोकणातील प्रवाशांनी आणि पर्यटकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन गोवा राज्य परिवहन महामंडळाच्या (कदंबा) वतीने करण्यात आले आहे. नव्या सेवेमुळे कोकण-गोवा प्रवास अधिक सोयीचा होण्याबरोबरच दोन्ही भागांतील पर्यटन आणि प्रवासी संपर्काला बळ मिळणार आहे.
