शंभरहून अधिक ग्रामस्थांचा अभियंत्यांना घेराव; कामे थांबवून वीजपुरवठा सुरळीत करण्यास भाग पाडले..
बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरातील सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या शंभरहून अधिक ग्रामस्थांनी आज महावितरणच्या बांदा कार्यालयावर धडक देत प्रशिक्षणार्थी सहाय्यक अभियंता वैष्णव कांबळे यांना घेराव घातला. देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. ग्रामस्थांनी अभियंत्यांना सोबत घेत काळसेवाडी, निमजगावाडी व इन्सुली खामदेवनाका येथे सुरू असलेली कामे थांबवून दुपारी एक वाजता शहरातील वीजपुरवठा सुरळीत करून घेतला. ‘ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठीच ही कामे केली जातात का?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला.
दरम्यान, वारंवार वीजखंडित होत असताना भरमसाठ वीजबिले कशी आकारली जातात, असा जाबही अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. बांद्यात स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध दर्शवत प्रथम विद्यमान वीजयंत्रणा सक्षम करून अखंडित वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. संतप्त ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा तसेच वरिष्ठ अधिकारी बांद्यात दाखल न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. सहाय्यक अभियंता कांबळे यांच्या टेबलवर मेणबत्ती पेटवून ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने निषेधही नोंदविला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर, सुशांत पांगम, अजय महाजन, मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत, शिवसेना युवा सेना तालुका प्रमुख रियाज खान, माजी उपसरपंच हर्षद कामत, भाऊ वाळके, विठ्ठल वाळके, शुभम पांगम, निखिल मयेकर, सुनील माजगावकर, बिपीन येडवे, ओंकार नाडकर्णी, संदेश नाईक, मुन्ना खान, मोहसीन खान, प्रशांत कोचरेकर, पांडू नाटेकर, राकेश वाळके, गजानन गायतोंडे, शुभम साळगावकर, सर्वेश मुळ्ये, दादा साळगावकर, सिद्धेश शिरोडकर, राकेश विरनोडकर, समीर परब, दत्ताराम बांदेकर, दया साळगावकर, गौरव गवंडे, प्रसाद गायतोंडे, प्रतीक नार्वेकर, अर्णव स्वार यांच्यासह 100 हुन अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.
