ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार सचिन पाटिल यांना निवेदन
कुडाळ : आताच्या काळात एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याची आमच्या गावातून बदली करू नका असे निवेदन घेऊन ग्रामस्थ तहसीलदारांकडे जातात आणि तहसीलदार सुद्धा त्या कर्मचाऱ्याबद्दल आदरपूर्वक उल्लेख करतात तेव्हा तो कर्मचारी आपल्या कामाप्रती किती प्रामाणिक असेल याची कल्पना येते. असाच काहीसा प्रकार तालुक्यातील हिर्लोक गावात घडला. हिर्लोक गावातील लोकांशी आपुलकीने वागून महसुलच्या सर्व अडचणींवर मात करणारे तलाठी संतोष बांदेकर यांची किमान गावातुन तीन वर्षे तरी बदली करु नये अशी मागणी हिर्लोक ग्रामस्थांनी तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे केली आहे. तशा आशयाचे ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन आत्मा मिती सदस्य बाजीराव झेंडे आणि हिर्लोक उपसरपंच नरेंद्र राणे यांनी तहसीलदार सचिन पाटील यांना दिले.
आज कुडाळ तहसीलदार सचिन पाटिल यांची हिर्लोक ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने भेट घेत हे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे कि, किती कालांतराने एक चांगला महसुल अधिकारी म्हणून संतोष बांदेकर हे आमच्या गावाला लाभले आहेत, याचा आम्हा ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे. तसेच महसुलची जी जी कामे असतात ती ईमाने ईतबारे करुन गावातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचुन महसुलच्या ज्या काही योजना आहेत त्या सांगतात. अशा या गुणी तलाठी संतोष बांदेकर यांची किमान तीन वर्षे तरी गावातुन बदली करु नये अशा प्रकारचे निवेदन आज देण्यात आले.
यावेळी तहसीलदार सचिन पाटिल म्हणाले, कुडाळ तालुक्यात मला माझा स्टाफ चांगलाच आहेच, परंतु संतोष बांदेकर एक अतिशय हुशार महसुल अधिकारी म्हणून लाभला आहे. त्याची बदली करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असेही श्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे नेते अतुल बंगे, कृषी आत्मा समितीचे बाजीराव झेंडे, हीर्लोक उपसरपंच नरेंद्र राणे, शाम सावंत, समिर सावंत, दीपक परब आदी उपस्थित होते.
