पुतण्या गंभीर, काकी किरकोळ जखमी..
ओरोस ता १८:
महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार संरक्षक कठड्यावर आदळली. त्यामुळे कार कठडा तोडून थेट सर्व्हिस रोडवरील दुचाकीवर कोसळली आणि क्षणार्धात पुतण्या-काकी कार व रेलिंगखाली अडकले. महामार्ग आणि सर्व्हिस रोडमधील अवघ्या तीन फुटांच्या जागेत दोघेही मदतीसाठी विव्हळत होते. काही क्षणांसाठी काळजाचा ठोका चुकवणारे दृश्य निर्माण झाले.
महामार्ग वाहतूक पोलिस, सिंधुदुर्गनगरी पोलिस आणि स्थानिकांनी धाव घेत दोघांची सुटका केली. या भीषण अपघातात इंद्रजीत बोडेकर (वय २३) गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी गोव्यातील बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील सावंतवाडा परिसरात मंगळवारी (ता. १८) दुपारी सव्वातीनच्या सुमारास हा अपघात झाला. इंद्रजीत याच्यासोबत दुचाकीवर असलेल्या त्याच्या काकी पुष्पा बोडेकर (वय ५०, दोघे रा. रवळनाथनगर, ओरोस) या किरकोळ जखमी झाल्या. कारचालक आणि त्याच्यासोबत असलेल्या सहप्रवाशालाही किरकोळ दुखापत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी स्विफ्ट कार (केए २२ पी ७३६१) कणकवलीहून कुडाळच्या दिशेने जात होती. सावंतवाडा परिसरात आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार प्रथम महामार्गाच्या कडेला असलेल्या संरक्षक कठड्यावर जोरदार आदळली. धडकेची तीव्रता एवढी होती की कठडा तुटला आणि कार खाली असलेल्या सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या दुचाकीवर (एमएच ०७ एपी ५०८८) कोसळली.
इंद्रजीत आणि त्याची काकी पुष्पा हे ओरोस फाट्याकडून सुलोचनगरच्या दिशेने जात होते. याचवेळी कारसोबत महामार्गाचे संरक्षक रेलिंगही दुचाकीवर कोसळल्याने इंद्रजीतला गंभीर दुखापत झाली. त्याच्या मानेला मोठी दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. कार, रेलिंग आणि दुचाकीच्या मध्ये पुतण्या-काकी अडकल्याने त्यांना बाहेर काढणे कठीण झाले होते.
महामार्ग आणि सर्व्हिस रोडमध्ये सुमारे तीन फुटांचे अंतर असल्याने बचावकार्यही आव्हानात्मक बनले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिस व सिंधुदुर्गनगरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे प्रभारी शेखर लव्हे यांनी स्वतः घटनास्थळी उतरून स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले.
कारखाली अडकलेल्या पुतण्या-काकीची सुटका केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णवाहिकेची वाट न पाहता पोलिसांनी शासकीय वाहनातून दोघांनाही तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
इंद्रजीतवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी गोव्यातील बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले. पुष्पा बोडेकर यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
अपघातात कार आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महामार्गाचा संरक्षक कठडा तसेच स्ट्रीट लाईटचा पोलही तुटून पडला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
याप्रकरणी कारचालक परशुराम लालप्पा लमानी (वय २७, मूळ रा. बागलकोट, कर्नाटक; सध्या रा. तरळे, कणकवली) याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
