गैरशैक्षणिक धोरणाविरोधात लढा उभारण्याचा निर्धार…

कणकवलीत शैक्षणिक परिषद प्रसंगी शिक्षण बचाव मंचची स्थापना..

⚡कणकवली ता.०४-: शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करून, भविष्यातील वाटचालीची दिशा ठरवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शैक्षणिक परिषद 2023 कणकवलीतील मराठा मंडळ सभागृहात पार पडली.

सुरुवातीला बुक्टुचे अध्यक्ष प्रा. डॉ. गुलाबराव राजे यांनी बीजभाषण केले. ते म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या स्तरावरील प्रश्न वेगवेगळे आहेत. गेल्या काही महिन्यात शिक्षणाच्या खाजगीकरणाचा वेग वाढलेला आहे. नवीन शिक्षण पद्धतीचे गाजर दाखवून खाजगीकरणाची पोळी भाजून घेण्याचे काम सध्या चालू आहे. शिक्षण व्यवस्थेला रसातळाला नेण्याचे व त्याच्या पायाभूत गोष्टीवरच घाला घालण्याचे काम शासन करत आहे. यासाठी आपण एक एकटे लढून चालणार नाही तर सर्वांनी एकत्र येऊन मजबूत लढा उभारला पाहिजे.

त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री. आर. बी. सिंग म्हणाले, शिक्षण क्षेत्रातीलच सरकारच्या काही बगलबच्चानी सी एच बी सारख्या धोरणाला पाठिंबा देऊन शिक्षण क्षेत्राचे फार मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे अनेक कंत्राटी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अत्यंत अल्प पगारावर काम करत आहेत याचा विचार कायम नेमणूक झालेल्या व पूर्ण पगार घेणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केला पाहिजे. भविष्यात शाळा, महाविद्यालये बंद झाली तर आपणास कोण पगार देणार याचाही विचार व्हायला हवा. त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकाच्या प्रश्नावर सर्वांनीच एकत्र आले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे 14 डिसेंबर 23 पासून सुरु होणाऱ्या बेमुदत संपात सर्व संघटनांनी संपूर्ण ताकतीने उतरले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या माजी अध्यक्ष डॉ तपती मुखोपाध्याय यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक संस्थांचे समूह शाळा, समूह विद्यापीठात रूपांतर करून ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्था उध्वस्त करण्याचे काम कसे सुरू आहे हे दाखवून दिले. राज्य सरकारच्या शिक्षण विषयक अधिकारावर गदा आणली जात आहे. शिक्षणातील एकेकास्तरावर सरकार हल्ला करून उध्वस्त करत असताना आपण मात्र अजूनही उदासीन आहोत. शिक्षणाचे खरे लाभार्थी विद्यार्थी व पालक आहेत. त्यांच्यासाठी शिक्षण वाचवणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच अंगणवाडी ते पदव्युत्तर शिक्षण स्तरावरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना एकत्रित करून, त्यांचे योग्य प्रबोधन करून संघटितपणे शिक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शिक्षण बचाव मंचाची स्थापना व्हायला हवी असे मत त्यांनी व्यक्त केले.

या परिषदेत जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या. त्यामध्ये प्राथ. शिक्षक समितीचे राजन कोरगावकर, प्राथ. शिक्षक संघाचे राजाराम कविटकर, प्राथ. पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख संघाच्या स्नेहलता राणे, शिक्षक भारतीचे संजय वेतुरेकर, सत्यशोधक शिक्षक सभेचे अंकुश कदम, कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे किशोर कदम, उच्च माध्य. शिक्षक संघटनेचे शितोळे, मुख्याध्यापक संघाचे वामन तर्फे, एसएफआय विद्यार्थी संघटनेचे नवनाथ मोरे, आशा वर्कर युनियनच्या विजयाराणी पाटील व प्राचार्य भगवानसिंग राजपूत यांनी आपापल्या संघटनांच्या शिक्षण विषयक भूमिका स्पष्ट केल्या.

परिषदेत झालेल्या चर्चेवर आधारित ठराव तयार करून, त्याचे वाचन करून सर्वांनी मंजुरी दिली तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या सर्व मागण्या एकत्रित करून मागण्याची सनद तयार करण्यात आली. परिषदेला उपस्थित सर्व प्रतिनिधींनी हात उंचावून या ठरावास व मागण्याची सनद याला पाठिंबा दिला. परिषदेत मंजूर झालेले ठराव व मागण्यांची सनद महाराष्ट्राचे मा मुख्यमंत्री, मा शालेय शिक्षणमंत्री, मा उच्च शिक्षणमंत्री तसेच मुख्य सचिव व शिक्षण सचिव यांना पाठवून देण्यात येणार आहे.

या परिषदेत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक व आशा वर्कर्स संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या परिषदेचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. विनोदसिंह पाटील यांनी, पाहुण्यांची ओळख प्रा डॉ सोमनाथ कदम व स्वागत रंजन राणे यांनी केले. शेवटी संतोष पाताडे यांनी उपस्थितांचे व ही परिषद यशस्वी करण्यास हातभार लावणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

You cannot copy content of this page