Headlines

शिक्षकाअभावी तोंडवळी खालची शाळा मुलांविनाच उघडली

शिक्षक रुजू होईपर्यंत पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा पालकांचा निर्धार

⚡मालवण ता.०१-:
मालवण तालुक्यातील तोंडवळी खालची येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील तीन शिक्षकांपैकी एक शिक्षक कामगिरीवर पाठविल्याने शिक्षकांची झालेली अपुरी संख्येमुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी तोंडवळी खालची येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांविनाच उघडली. शिक्षकांची पुन्हा नियुक्ती होईपर्यंत आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणार नसल्याचा ठाम निर्णय पालकांनी घेतल्याने शाळेत एकही विद्यार्थी उपस्थित नव्हता.

दरम्यान, या शाळेत उद्या गुरुवारी एक कामगिरीवर शिक्षक पाठविण्यात येणार असून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यात येईल अशी माहिती मालवणचे गटशिक्षणाधिकारी श्री संजय माने यांनी दिली

यांसबधीचे अधिक वृत्त असे की,
मालवण तालुक्यातील
तोंडवळी खालची येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग असून
या शाळेची एकूण पटसंख्या २८ असून, यापूर्वी येथे तीन शिक्षक अध्यापनाचे काम पाहत होते. मात्र, त्यापैकी एका शिक्षकाची अन्यत्र कामगिरीवर नियुक्ती करण्यात आल्याने सध्या केवळ मुख्याध्यापक आणि एक सहशिक्षक असे दोनच शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार व प्रभावी अध्यापन करणे शक्य होत नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

मंगळवारी झालेल्या पालकांच्या बैठकीत शिक्षकांची रिक्त जागा तातडीने भरली जाईपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी शाळेत एकही विद्यार्थी उपस्थित नव्हता.
यानंतर पालकांनी मुख्याध्यापक श्री. महाजन यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी जान्हवी पराडकर, सुरेंद्र मालंडकर, केतकी मायबा, अनुष्का जुवाटकर, शमिका धुरी, मनस्वी तोडणेकर, गायत्री रेवंडकर, देवेंद्र मायबा, प्रिया तोरस्कर, गणपत शेलटकर, आनंद कोचरेकर, नम्रता नंदकुमार कोचरेकर, गणेश रेवंडकर, नीलिमा रेवंडकर, अनिरुद्ध जुवाटकर, पुंडलिक मालंडकर, स्वप्नील संजय तारी, नंदकुमार कोचरेकर, विजय खवणेकर यांच्यासह अन्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page