तुंबलेल्या गटाराची तातडीने सफाई: नागरिकांकडून समाधान व्यक्त..
सावंतवाडी ता.०१-: मुसळधार पावसामुळे माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिर परिसरातील गटार तुंबल्याने पावसाचे पाणी काही नागरिकांच्या घरात शिरण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबत माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक सुधीर आडीवरेकर व नगरसेविका दुरळी रांगणेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी तात्काळ नगरपालिका कर्मचाऱ्यांना पाचारण करून तुंबलेले गटार साफ करण्याच्या सूचना दिल्या. पालिका कर्मचाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करत गटार सफाईचे काम हाती घेतल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांनी देखील या प्रकाराची दखल घेत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनीही कर्मचाऱ्यांना तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाच्या तत्परतेमुळे माटेवाडा परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला.
