⚡कणकवली ता.०१-: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर मान्यताप्राप्त तथा सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय, हरकुळ बुद्रुक (ता. कणकवली) येथील द्वितीय वर्षाच्या वार्षिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून महाविद्यालयाने ९५ टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
यामध्ये १३ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महाविद्यालयातून सार्थक निलेश पाटील यांनी ८१.०७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, नंदिनी आनंद चव्हाण यांनी ८०.८६ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर खुशी प्रदीप कामतेकर यांनी ८०.७० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था प्रमुख तथा विद्यमान खासदार नारायण राणे, संस्था अध्यक्षा नीलम राणे, उपाध्यक्ष आमदार निलेश राणे, सचिव तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि डेअरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रसाद सावंत यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या तंत्रशुद्ध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल करिअर घडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना रोजगार तसेच शासकीय सेवांमध्ये विविध संधी उपलब्ध होत आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पशुधन पर्यवेक्षक किंवा तत्सम पदांवर, डेअरी पर्यवेक्षक म्हणून तसेच पशुवैद्यकीय व दुग्ध व्यवसायाशी संबंधित तांत्रिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होत असून कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्था करत आहे.
