प्रांताधिकाऱ्यांच्या समर्थनासाठीही काही संघटना, सामाजिक कार्यकर्ते सरसावले:मराठी शाळा वाचविण्यासाठीही आंदोलन व्हावे..
⚡कणकवली ता.०१-: शिक्षक व कर्मचारी संघटनांनी प्रांताधिकाऱ्यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन छेडल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ काही सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्तेही पुढे सरसावले आहेत. सत्यशोधक संघटनेतर्फे याचा बॅनरही प्रांत कार्यालयानजीक लावण्यात आला असून त्यात प्रामाणिक व कर्तव्यदक्षपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मराठी शाळा वाचविण्यासाठीही आंदोलन व्हावे, अशा प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
काही सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे, शासनाने इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मोठ्या प्रमाणात मान्यता दिल्याने गोरगरीब जनताही कर्जबाजारी होत मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालतात. शिक्षक संघटनांच्या माध्यमातून मराठी शाळा वाचविण्यासाठी अशा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अटकाव करावा, यासाठी आंदोलन उभारावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश कदम, तानाजी सावंत, संदीप नानचे व एकनाथ सावंत यांनी म्हटले आहे.
शिक्षक हा समाज घडविणारा मोठा आधारस्तंभ आहे. शिक्षक वर्गाचा ज्ञानदाता म्हणून आदर होणे गरजेचेच आहे. महसूल अधिकाऱ्यांकडून बीएलओ प्रशिक्षणादरम्यान, अपशब्द वापरला गेल्याने संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणे हा राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे, याबाबत दुमत नाही. मात्र, या निमित्ताने शिक्षकवर्गातील एकजूट व एकता दिसून आली. ग्रामीण भागातील शाळा पटसंख्येअभावी बंद पडत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या वाढत्या संख्येमुळे हे घडत असून त्या शाळांना शासनाकडूनच मान्यता मिळते. त्यामुळे या मराठी शाळा वाचविण्यासाठीही प्रयत्न करावेत, असे या पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, सत्यशोधक सेक्युलर फ्रंट, सत्यशोधक शिक्षण बचाव संघर्ष समितीच्यावतीनेही प्रांत कार्यालयानजीक बॅनर लावण्यात आला आहे. यामध्ये प्रांताधिकाऱ्यांनी प्रामाणिक व कर्तव्यदक्षपणे काम करताना गोरगरीब, कष्टकऱ्यांची कामे केली आहेत. गोरगरीबांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांची आम्हाला गरज आहे, असे नमूद करण्यात आले आहे. यामध्येच जिल्ह्यात जवळपास दोनशे शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. काही बंद पडल्या आहेत. गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून हद्दपार होत आहे, याचे कोणाला सोयरसुतक नसल्याचाही उल्लेख आहे. बॅनरवर सत्यशोधकचे अॅड. सुदीप कांबळे यांचा उल्लेख आहे.
