⚡वेंगुर्ला ता.०१-: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने मागील कालावधीत कृषी क्षेत्रात संशोधनात्मक असे अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यामुळे आंबा- काजू बाबतीत रोजगार निर्मिती शक्य झाली आहे. बदलत्या हवामानामुळे आज जरी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्या, तरी पुढील कालावधीत कृषी विद्यापीठामार्फत योग्य संशोधनात्मक कार्य करण्यात येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली चे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी बुधवारी 1 जुलै रोजी वेंगुर्ला येथे बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व कृषिदीनानिमित्त कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे भेट देऊन शास्त्रज्ञाशी संवाद साधला. डॉ. भावे यांच्या हस्ते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी श्री. भावे यांच्या हस्ते फळ संशोधन प्रांगणात वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी त्यांनी प्रक्षेत्रावर भेट, प्रायोगिक कामे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक कामे तसेच शेतकऱ्यांचा सन्मान व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रादेशिक फळ केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे, प्रा. प्रकाश क्षीरसागर, प्रा. सागर मोरे, डॉ. मिथिलेश सणस, डॉ. भीमराव ठवरे, प्रगतशील शेतकरी दाजी परब, नामदेव सरमळकर, श्री. बोवलेकर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. अजित साटेलकर, सचिन गोरे, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. गोवेकर आदी उपस्थित होते.
कोकण कृषी विद्यापीठाचे कृषी क्षेत्रात अमूल्य कार्य-:डॉ. संजय भावे…
