हजारो महीला पुरुष भाविकांनी लोटांगण घालून फेडला नवस..
सावंतवाडी
भक्तांच्या अलोट गर्दीत,आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष महीला भाविकांनी सोनुर्ली माऊली चरणी लोटांगण घालून आपला नवस फेड केला, मंगळवारी रात्रौ जत्रौत्सवात पार पडलेला हा नयनरम्य क्षण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी उसळली होती.दुसर्या दिवशी बुधवारी तुलाभाराने आणि देवीच्या कौलाने जत्रोत्सवाची उत्साहात सांगता झाली.
दक्षिण कोकणची प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सोनुर्ली श्री देवी माऊली चा दोन दिवस चालणाऱ्या जत्रोत्सवाला मंगळवारी रात्रौ तुफान गर्दी उसळली, मंदिराकडे जाणारे रस्ते आणि परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. दिवसभर असलेल्या तुरळक गर्दीचे रुपांतर रात्रौ आठनंतर भाविकांचा जनसागरात पाहायला मिळाले. रात्रौ ठिक साडेदहा वाजता देवीची पालखी कुळघराकडून वाजत गाजत फटाक्याच्या आतषबाजीत मंदिरात दाखल झाल्यानंतर विधीवत प्रथेप्रमाणे अकरा वाजता लोटांगणाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली. तत्पूर्वी भाविक भक्तांना देवीचे दर्शन आणि ओटी केळी ठेवण्याचे काम अविरत सुरु होते. पालखी मंदिरात आल्यानंतर हा कार्यक्रम बंद ठेवण्यात आला. त्यानंतर मंदिराच्या सभामंडपाच्या पायरीपासून लोटांगणाला सुरूवात झाली व मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करीत त्याच पायरीपर्यंत येऊन ती पूर्ण केली.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही हजारो महीला पुरुष भक्तांनी लोटांगण घालून आपल नवस फेड केला.
