Headlines

कट्टा येथील हरीनाम सप्ताहाची सांगता…

⚡मालवण ता.२३-: कट्टा बाजारपेठ येथील विठ्ठल-रखुमाई, लक्ष्मीनारायण मंदिर येथे गेले सात दिवस भक्तिभावाने सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाची विनोद गगनग्रास यांच्या पौरोहित्याखाली सांगता झाली. विठ्ठल नामाच्या जयघोष करत “गावात नेहमी सुख समृद्धी नांदू दे”, असे साकडे यावेळी भाविकांनी पांडुरंगाच्या चरणी घातले.

हरीनाम सप्ताहनिमित्त कट्टा बाजारपेठ येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात गेले सात दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात भजने, महाआरती, रात्री आकर्षक देखाव्यांसह दिंडी सोहळा झाला. मंदिर परिसर व संपूर्ण बाजारपेठेतही विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सप्ताहाची सांगता पालखी सोहळ्याने झाली. विठ्ठल रखुमाईची पालखी संपूर्ण बाजारपेठेत घरोघरी नेण्यात आली. विठ्ठल-रखुमाई व संत तुकारामांच्या वेषातील पात्रे लक्ष वेधून घेत होती. दरवाजासमोर आकर्षक रांगोळी काढून भाविक पालखीच्या स्वागतासाठी सज्ज होते. सायंकाळी गावातून पालखी पुन्हा विठ्ठल रखुमाई मंदिरात आणण्यात आली व महाआरतीने सांगता झाली. यावेळी कट्टा बाजारपेठेसह गावातील भाविक तसेच देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page