मत्स्य विभागाचे मच्छिमारांना आवाहन..
⚡मालवण ता.२४-: मालवणात ४ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या नौसेना दिनानिमित्त मालवण आणि तारकर्लीसमोरील समुद्रात २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या रंगीत तालमीच्या ठिकाणापासून दूर मच्छीमारांनी नौकानयन करावे. तसेच राजकोट बंदरातील नौका लवकरात लवकर मालवण बंदरात किंवा अन्यत्र स्थलांतरित कराव्यात, असे आवाहन सहाय्यक मत्स्य आयुक्त एस. एस. अलगिरी यांनी मच्छीमारांना केले.
मालवण येथील मत्स्य कार्यालयात मच्छीमार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत श्री. अलगिरी हे बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी, कृष्णनाथ तांडेल, सदानंद सारंग, गणेश गावकर, सतेजा वायंगणकर, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर आदी उपस्थित होते. नौसेना दिन यशस्वी करण्यासाठी मच्छीमारांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी अलगिरी यांनी केले.
नौदल दिनानिमित्त होणाऱ्या रंगीत तालमीसाठी निश्चित केलेले चार पॉईंट, तर नौका नांगरणीच्या दोन पॉईंटपासून मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या नौका दूर ठेवून शासनास सहकार्य करावे. एखादी दुर्घटना घडल्यास किंवा नुकसान झाल्यास भरपाई मिळणार नाही, तरी अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मेघनाद धुरी यांनी मच्छीमारांना केले आहे.
