राष्ट्रवादीचे गौरांग शेर्लेकर यांचा सवाल : निधी असूनही वितरणास दिरंगाई केल्यास जनप्रक्षोपाला समोर जावे लागणार..
⚡बांदा ता.१८-: सावंतवाडी तालुक्यात गतकाळात झालेल्या पूरग्रस्त व तौक्ते चक्रीवादळात झालेली नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारकडून दोन कोटी रुपयांचा निधी आला आहे. परंतु नुकसानग्रस्तांना वितरण करण्यास दिरंगाई होत आहे. पंचनामे करताना सुद्धा आर्थिक व्यवहार झालेला असून पूर्णपणे विसंगती होत आहे. सावंतवाडी तहसीलदार प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व वंचित राहिलेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अन्यथा सर्वसामान्य जनतेच्या जनप्रक्षोपाला सामोरे जावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस युवक सावंतवाडी तालुका सचिव गौरांग शेर्लेकर यांनी प्रशासनास दिला आहे.
गतकाळात सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी पात्राजवळील अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. यात शेतकरी, नागरिक, व्यापाऱ्यांसह अन्य जणांचे लाखोंचे नुकसान झाले. त्यानंतर आलेल्या तौक्ते चक्रीवादळातही नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना राज्य सरकारकडून दोन कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध झाला आहे. मात्र वितरण करण्यास तहसीलदार कार्यालयाकडून दिरंगाई होत आहे.
नुकसान केलेल्या भागाचे पंचनामे करताना सुद्धा आर्थिक अपहार झाला असून यात पूर्णपणे विसंगती दिसत आहे. याकडे तहसीलदार प्रशासनाने वेळीच लक्ष देत भरपाई पासून वंचित असलेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी. अन्यथा सर्वसामान्य जनतेच्या जनप्रक्षोपाला सामोरे जावे लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस युवक सावंतवाडी तालुका सचिव गौरांग शेर्लेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
