अल्प प्रतिसाद मिळाल्याने मोर्चा झालाच नाही:घोषणा, भाषणे करीत केले आंदोलन
सिंधुदुर्गनगरी ता ८
राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित आजच्या मोर्चास कर्मचाऱ्यांच्या अल्प प्रतिसाद लाभल्याले मोर्चा निघालाच नाही. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले.
राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज ८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकुटुंब धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग समन्वय समितीच्या राजन कोरगांवकर यांनी दिली होती.
“माझे कुटुंब माझी पेन्शन” या टॅग लाईन खाली कर्मचाऱ्यांना मिळणारी जुनी पेन्शन व कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या इतर मागण्यांसाठी आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा मोर्चा रवळनाथ मंदिर ओरोस ते जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग असा मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मोर्चाला कर्मचाऱ्यांचा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. या बाबत संघटनेच्या पदाधिकारी यांनी यावेळी बोलताना खंत व्यक्त केली. या मोर्चामध्ये आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्र मंडळी यांचेसह सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केलेले असतानाही केवळ विविध संघटनांचे पदाधिकारी व काही कर्मचारी शेकड़ोंच्या संखेने उपस्थिती दिसून आली. यात २००५ नतर शासकीय सेवेत दाखल झालेले आणि ज्यांच्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे अश्या कर्मचाऱ्यांचा तर अत्यल्प प्रतिसाद दिसून आला. याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्याची नाराजी दिसून आली.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या आजच्या आंदोलनावेळी बोलताना संघटनेच्या पदधिकारी राजन कोरगावकर, के टी चव्हाण, एस एल सकपाळ यांनी ही आरपारची लढाई आहे. आता नाही तर कधीच नाही. एकच मिशन जुनी पेन्शन. माझे भविष्य माझी लढाई, असे आवाहन करत सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे, शासन रस्त्यावर उतरल्याशिवाय काही देणार नाही.त्यामुळे शासनाने आमच्या मागणीचा विचार करून जुनी पेंशन सर्व कर्मचाऱ्यांना लागु करावी . अन्यथा यापुढे होणाऱ्या निवडणुकीत जो आम्हाला जुनी पेंशन देणार त्यालाच मत देणार असा संकल्प करुया असे सांगितले. तसेच शासकीय कर्मचारी हे खेड़ोंपाडयातील ऑटमबॉम्ब आहेत ते फुटले तर हे सरकार उडून द्यायला वेळ लागणार नाही. शासकीय कर्मचाऱ्याना त्रास देणाऱ्या सरकारला यापूर्वी पायउतार व्हावे लागले हा इतिहास आहे. त्याची शासनाने दखल घ्यावी. अन्यथा १४ डिसेंबर पासून सर्व कर्मचारी संपावर जातील. असा इशारहि यावेळी देण्यात आला.
यावेळी सरकारी निमसरकारी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग अध्यक्ष राजन कोरगांवकर, सरचिटणीस सत्यवान माळवे, राजन वालावलकर, सखाराम सकपाळ, सचिन माने, के टी चव्हाण यांच्यासह विविध कर्मचारी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
