⚡कणकवली ता.०८-:
कणकवली तालुक्यातील असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचालित दिविजा वृध्दाश्रमामार्फत शालेय मुलांना दीपावलीचे औचित्य साधून सुवासिक उटणे वाटप करण्यात आले. कणकवली, देवगड तालुक्यातील शाळेतील 10 हजार विद्यार्थ्यांना हे सुवासिक उटणे मोफत वाटप करण्यात आले.
हिंदू परंपरेने दिवाळीचा पहिल्या दिवशी सुवासिक उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. यासाठी दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी स्वतः उटणे बनवून आपल्या नातवडांसाठी मोफत उटण्याचे वाटप दिविजा वृध्दाश्रमामार्फत कणकवली तालुक्यातील विविध शाळांना केले. सुमारे दहा हजार उटणे पाकिटे वाटप करण्यात आलीत.
या सुवासिक उटणे वाटपाचा प्रारंभ कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयात करण्यात आला. यावेळी स्वस्तिक फाऊंडेशनचे विश्वस्त संदेश शेट्ये यांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना उटणे वाटप करण्यात आले. यावेळी कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक एन. सी. कुचेकर, सहाय्यक शिक्षिका बी. बी. बिसुरे, आर. आर. सरवणकर, ए. एस. पेडणेकर, वरिष्ठ लिपिक सुनिता कांबळे व दिविजा वृध्दाश्रमाचे कर्मचारी उपस्थित होते.
यावर्षी या वृध्दाश्रमामार्फत कणकवली तालुक्यातील कसार्डे माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्याय, सरस्वती हायस्कूल नांदगाव, माध्यमिक विद्यालय कोळोशी – हडपिड, बाल शिवाजी हायस्कूल जाणवली, एस. एम. हायस्कूल कणकवली, आयडियल स्कूल कणकवली, फोंडा हायस्कूल कणकवली तर देवगड तालुक्यातील केळकर कॉलेज देवगड, शिरगाव हायस्कूल शिरगाव, जामसंडे हायस्कूल जामसंडे या माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत उटणे पाकीट वाटप करण्यात आले.
स्वस्तिक फाऊंडेशन या संस्थेचा हा उपक्रम खरचं कौतुकास्पद आहे. मुलांनी या वृध्दाश्रमाला एकदातरी भेट द्यावी, असे मनोगत उपस्थितांनी व्यक्त केले.
