प्रसंगी निवडणुकीवरही बहिष्कार टाकू ; पारंपारिक मच्छिमारांची आक्रमक भूमिका..
⚡मालवण ता.०७-: जिल्ह्यात केवळ १३ पर्ससीन नौकांना मासेमारीचा परवाना असताना मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पर्ससीन नौकांद्वारे मासेमारी सुरु असून यामुळे पारंपारिक मच्छिमारांच्या रोजीरोटीवर परिणाम होत आहे. अनधिकृत पर्ससीन नौकांवर करावाई करण्यासाठी कायदा असतानाही मत्स्य विभाग कारवाई करत नसल्यामुळेच आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागत आहे. यापुढे समुद्रात अनधिकृत पर्ससीन नौका मासेमारी करताना दिसल्यावर त्यांना मत्स्य विभाग रोखू न शकल्यास आम्ही पारंपारिक मच्छिमारच कायदा हातात घेऊन पर्ससीनवर कारवाई करू, असा इशारा पारंपारिक मच्छिमारांनी पत्रकार परिषदेत देतानाच अनधिकृत पर्ससीन वरील कारवाईचा प्रश्न शासनाकडून न सुटल्यास येत्या २०२४ च्या विधानसभा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू असा, इशाराही मच्छिमारांनी दिला.
मालवण दांडी येथील श्रीकृष्ण मंदिरात पारंपारिक मच्छिमारांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मिथुन मालंडकर, बाबी जोगी, सन्मेष परब, भाऊ मोर्जे, महेश कोयंडे, भूषण जुवाटकर यांसह इतर बहुसंख्य मच्छिमार उपस्थित होते.
यावेळी मिथुन मालंडकर म्हणाले, पर्ससीन मच्छिमारांनी आपण केंद्र शासनाच्या सागरी हद्दीत मासेमारी करतो, तसेच बंदरात उभ्या असलेल्या पर्ससीन नौकांवर कारवाई चुकीची आहे, असे म्हटले आहे. मात्र, केंद्राच्या सागरी हद्दीत मासेमारी करण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे का ? तसेच पर्ससीन मच्छिमार कायद्यातील अटी शर्ती व नियमांचे पालन करतात का ? अनेक पर्ससीन नौकांची नोंदणी झालेली नाही, मासेमारी परवाना नाही, तसेच बंदरात असलेल्या पर्ससीन नौकांकडेही परवाना नाही, पर्ससीन जाळ्याच्या आसाची मापे नियमानुसार नाहीत, अनेक छोट्या नौका पर्ससीन साठी वापरल्या जात आहेत, नौकांवरील परप्रांतीय व नेपाळी खलाशांची नोंद नाही, अशा अनेक बाबी असून आपण नियमात मासेमारी करतो असे कोणत्या आधारे पर्ससीन मच्छिमार म्हणत आहेत ? असा सवाल मिथुन मालंडकर यांनी व्यक्त केला.
मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पर्ससीन मासेमारी होत असताना कारवाई न करण्यासाठी मत्स्य विभागावर कोणता दबाव आहे. पर्ससीन विरोधातील संघर्षामुळे मच्छिमार कुटुंबातील महिला वर्गाचीही फरफट होत आहे. म्हणूनच काल महिलांनी मत्स्य विभाग कार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला. पर्ससीन विरोधात मालवणात सुरु असलेले हे आंदोलन यापुढे वेंगुर्ला व देवगड तालुक्यातही पसरणार आहे, असेही मालंडकर म्हणाले.
प्रशासनाचे पाठबळ असल्यामुळेच पर्ससीन मासेमारी चालू आहे, संघर्ष थांबविण्याचे काम शासनाच्याच हातात आहे, असे यावेळी बाबी जोगी म्हणाले. तसेच राज्याच्या सागरी हद्दी बाहेर केंद्र शासनाच्या सागरी हद्दीत मासेमारी करतो असे पर्ससीन मच्छिमार म्हणत असतील तर त्यांच्या नौका मासेमारी करताना आम्हाला किनाऱ्यावरून दिसतात कशा ? असा सवाल महेश कोयंडे यांनी केला.
तसेच २०२४ मधील निवडणुकांपूर्वी अनधिकृत पर्ससीन मासेमारी बंद झाली नाही तर निवडणुकीवर मच्छिमार बहिष्कार टाकतील, लोकप्रतिनिधी व राजकीय मंडळींनी मते मागायला आमच्या घरी येऊ नये. आम्ही सामंजस्याने लढत असून अनधिकृत पर्ससीन बंद न झाल्यास आक्रमक भूमिका घेऊ, असे भूषण जुवाटकर यांनी मच्छिमारांच्या वतीने सांगितले. यावेळी राजकीय पक्षात असलेले बाबी जोगी व सन्मेष परब यांनीही या भूमिकेस सहमती दर्शवीत जी मच्छिमारांची भूमिका तीच आमची भूमिका असे जोगी व परब यांनी स्पष्ट केले.
