⚡मालवण ता.०६-: मालवण कसाल रस्त्यावर कुंभारमाठ येथे कारला ओव्हरेटक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीची कारला मागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील मुरारी जाटव (२५ मूळ रा. राजस्थान) व देसवीर जाटव (२५ मूळ रा. राजस्थान) हे दोघे गंभीररित्या जखमी होऊन यातील मुरारी जाटव याचा मृत्यू झाला. हा अपघात आज सायंकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातातील देसवीर जाटव याच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
ओरोस येथे वास्तव्यास असणारे राजस्थान येथील कामगार मुरारी जाटव, देसवीर जाटव, अरूण जाटव, सोनू जाटव हे चौघे आज सोमवारी दुचाकीने मालवण येथे फिरावयास आले होते. फिरून झाल्यावर सायंकाळी हे चारही युवक मालवणहून ओरोसला परतत असताना सायंकाळी ३.४५ च्या सुमारास पल्सर (क्र. एमएच ०२ सीएम ३१२) या दुचाकीवरील मुरारी जाटव व देसवीर जाटव हे कुंभारमाठ येथे आले असता समोर असलेल्या इटॉस कारला ओव्हरेटक करण्यास गेले. ओव्हरटेक करतेवेळी उजव्या बाजूने समोरून इनोव्हा कार येत असल्याने दुचाकी पुन्हा डाव्या बाजूला घेण्याच्या प्रयत्नात दुचाकीची समोरील इटॉस कारला मागून धडक बसल्याने मोटारसायकल रस्त्यावर कोसळली. या अपघातात मुरारी जाटव व देसवीर जाटव हे दोघेही गंभीरित्या जखमी झाले. यामध्ये मुरारी जाटव याच्या डोक्याला गंभीरित्या दुखापत झाली.
अपघात घडल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस दिपक तारी, महेंद्र देऊलकर, नितीन शेटये, अविनाश गायतोंडे यांनीही त्याठिकाणी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमी मुरारी जाटव व देसवीर जाटव यांना रुग्णवाहिकेने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु मुरारी जाटव याचा मृत्यू झाल्याचे रूग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. तर देसवीर जाटव याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, पोलीस कर्मचारी महादेव घागरे यांनी मालवण ग्रामीण रूग्णालय येथे धाव घेतली.
