⚡मालवण ता.२९-: मालवण येथील नगर वाचन मंदिर तर्फे आयोजित कवी शरद साटम स्मृती जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेत नारायण धुरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर व्दितीय क्रमांक भूषण दत्तदास व तृतीय क्रमांक आदिती आचरेकर यांनी मिळविला.
नगर वाचन मंदिरच्या सभागृहात ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवर परिक्षक, ज्येष्ठ स्पर्धक बबन हिवाळेकर, आदिती आचरेकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि श्री देवी सरस्वती व कवी शरद साटम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी व्यासपीठावर परिक्षक रविंद्र वराडकर, चारूशीला देऊलकर उपस्थित होते. प्रास्ताविक ग्रंथपाल संजय शिंदे यांनी करत कवी शरद साटम यांचे जीवन व साहित्या विषयी माहिती दिली.
या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक सुधीर गोसावी, उत्तेजनार्थ व्दितीय क्रमांक महेक शेख यांनी मिळविला. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कमेची पारितोषिके, प्रशस्तीपत्रके व कवी शरद साटम यांचा ‘छळवाद’ हा काव्यसंग्रह देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांनाही ‘छळवाद’ काव्यसंग्रहाची एक प्रत उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून देण्यात आली
या स्पर्धेचे सुत्रसंचालन श्रेया चव्हाण यांनी केले व या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा पेडणेकर व रमाकांत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
