साटेली ग्रामस्थांवर पाणी विकत घेण्याची वेळ…

गावात ४ दिवस पाणीबाणी; विद्यार्थ्यांचे पाण्याविना हाल…

⚡दोडामार्ग,ता.२०-: साटेली येथील नळपाणी योजना गेले चार दिवस बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू आहे.ग्रामस्थांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायत प्रशासन मात्र सुशेगाद आहे.निवडणूक आचारसंहिता असल्याने सरपंच,सदस्य सध्या न्युट्रल अवस्थेत असले तरी ग्रामविकास अधिकारी काय करताहेत असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. निवडणूक जाहीर झाल्या झाल्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे,त्यावर तोडगा न काढल्यास पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
नळ योजनेची नवीन पाइपलाइन घालण्याचे काम करताना ठेकेदाराच्या जेसीबीने जुनी पाइपलाइन फोडून टाकली त्यामुळे गावात पाणीसंकट उभे राहिले.साटेली ग्रामपंचायत च्या सात वाडयाना पाणीपुरवठा करणारी नळपाणी योजना गावातून वाहणाऱ्या तिलारी नदीवर कार्यान्वित आहे. गावातील शेकडो नळपाणी धारकांना याद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु मागील चार दिवसांपासून ही नळपाणी योजना बंद आहे. तर काही वाडयाना सहा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद
आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण कायम आहे. फुटलेली पाईपलाइन दुरुस्त करण्यात संबंधित ठेकेदार व ग्राम विकास अधिकारी कुचकामी ठरले आहेत.त्यामुळे लोकांवर ५०० रुपयांना १ हजार लिटर या दराने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.केंद्र शाळेनेही विद्यार्थ्यांसाठी पाण्याची व्यवस्था बाहेरून केली.

You cannot copy content of this page