⚡कणकवली ता.१९-: कुर्ली देवधर पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यात फोंडा – साईनगर येथे ३१ ऑगस्ट रोजी उदय रमेश शिरवलकर या शाळकरी मुलाचा अपघाती मृत्यू झाला . सदर मुलाच्या कुटुंबाची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. या कुटुंबाला मदत न मिळाल्यास
सिंधुदुर्गातील तमाम चर्मकार समाज बांधवांच्यावतीने सदर कुटुंबास न्याय मिळेपर्यंत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संबंधीत समाज संघटना प्रतिनिधीनी दिला आहे.
मृत उदय हा रमेश शिरवलकर यांचा एकुलचा एक मुलगा.
वडीलांची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने चुलत्याची सकाळी व संध्याकाळी गुरे चारून तो इ . १० वीचे शिक्षण घेत होता.
चुलतेच त्याच्या शिक्षणासाठी थोडाफार हातभार लावत.
असाच शाळेतून आल्यावर गुरे घेऊन सायंकाळी माळावर गेला असता म्हैशींना कालव्यात जाऊ नयेत म्हणून फिरविण्यासाठी जात असताना उदयचा पाय घसरला व तो तोल जाऊन खोल कालव्याच्या खड्डयात पडला . चिखलात रुतल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला .त्याचा मृत्यू होऊन दोन महिने उलटले तरीही पाटबंधारे विभागाचे अधिकारी किंवा शासनाने याची जराही दखल घेतली नाही .
चर्मकार समाज संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी ,जिल्हा पोलिस अधिक्षक ‘ तहसिलदार कणकवली ‘ विभागीय पोलिस अधिकारी तसेच पोलिस निरीक्षक कणकवली यांचेकडे निवेदने देण्यात आली आहेत तसेच कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग , आबडपाल कुडाळ यांचेकडे ही मदत देण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले आहे.
यावेळी चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवलीचे अध्यक्ष महानंद चव्हाण , उपाध्यक्ष सत्यविजय जाधव . सचिव मंगेश साळसकर ,निलेश शिरवलकर , सुर्यकांत शिरवलकर , विजय फोंडेकर ,अनिकेत फोंडेकर , अंकित फोंडेकर , दिपक फोंडेकर , रूपेश फोंडेकर, भिकाजी फोंडेकर ,भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई जिल्हा शाखा – सिंधुदुर्ग अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण , जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव इत्यादी समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
पाटबंधारे विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रमेश शिरवलकर यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले असून त्यांना तातडीची मदत होणे अत्यंत गरजेचे आहे.
शासनाने व संबंधित विभागाने याची दखल घेतली नाहीं व कालव्याचे काम सुरू केले तर सिंधुदुर्गातील तमाम चर्मकार समाज बांधवांच्यावतीने सदर कुटुंबास न्याय मिळेपर्यंत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संबंधीत समाज संघटना प्रतिनिधीनी दिला आहे.
