मालवणातील राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र अन्यत्र हलविण्याच्या हालचाली…

नाट्यप्रेमींचा तीव्र विरोध:तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा..

मालवण (प्रतिनिधी)

सन २०१८ पासून गेली सहा वर्षे राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे प्राथमिक फेरीचे केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात सुरळीत सुरु असताना हे केंद्र जिल्ह्यातील इतर तालुक्यात हलविण्यात येणार असल्याचे वृत्त असल्याने मालवणातील नाट्यप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. मालवणातील केंद्र अन्यत्र हलविण्यास मालवणच्या रंगकर्मीचा, बहुतांश नाट्यसंस्थांचा आणि रसिक प्रेक्षकांचा कडाडून विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. या स्पर्धेचे ठिकाण हलविण्यामध्ये काहींचा राजकीय हात असल्याचाही आरोप होत असून याबाबत शासनाने आपला निर्णय बदलला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नाट्यप्रेमींनी दिला आहे.

पूर्वी सिंधुदुर्गातील नाट्यसंस्थांना राज्यनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे रत्नागिरी हे जवळचे केंद्र होते. या जिल्ह्यातील रंगकर्मींना स्पर्धेतील नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी १७० ते १८० किलोमीटरचा ५ ते ६ तासांचा प्रवास करून रत्नागिरी गाठावी लागत होती. २०१८ पूर्वीच्या कित्येक वर्षांची होत असलेली ही गैरसोय मालवणचे रंगकर्मी संजय शिंदे व कुडाळचे रंगकर्मी केदार सामंत यांनी अथक प्रयत्नांनी आणि आमदार वैभव नाईक यांच्या शासन स्तरावरील सकारात्मक प्रयत्नातून हे केंद्र मालवणात आणून दूर केली होती. गेली चार वर्षे ही स्पर्धा मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात नाट्यसंस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि रसिकांच्या उदंड उपस्थितीत सुरळीतपणे सुरू होती, असे असताना ही स्पर्धा वेंगुर्ला येथे हलविण्यात येणार असल्याचे वृत्त असून स्पर्धा वेंगुर्ल्यात नेण्याचे कारणच काय ? असा प्रश्न नाट्यप्रेमीकडून उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात आणलेली ही स्पर्धा इतरत्र नेण्यापेक्षा शासनाची बालनाट्य किंवा संगीत नाट्यस्पर्धा वेंगुर्ल्यात सुरू करता आली तर प्रयत्न करावा, असे सर्व रंगकर्मीचे म्हणणे आहे. यासाठी काही मुठभर लोक एका राजकीय व्यक्तीला हाताशी धरून राजकारण करण्याचा प्रयत्न करते आहेत, ही बाब रंगकर्मी आणि रसिकांच्या पचनी पडलेली नाही. शिवाय इतर तालुक्यातील सदर रंगमंच नाट्यगृह नसून ते बहुउद्देशीय सभागृह आहे. रंगमंच लांबी आणि आकाराने खूपच लहान असून रंगमंचाकडे नाटकाच्या सेटची गाडी लागत नाही. त्यासाठी अक्षरश: कसरत करावी लागते. शिवाय सदर सभागृह हे मुख्य शहरापासून ३ ते ४ किलोमीटर लांब वस्ती नसलेल्या ठिकाणी आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्ग मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे, असेही नाट्यप्रेमींकडून बोलले जात आहे.

You cannot copy content of this page