आ गोपीचंद पडळकर:सिंधुदुर्गनगरीत धनगर आरक्षण यात्रा संपन्न..
ओरोस ता.१७-:
आम्हाला आरक्षण देण्याची कोणत्याही सरकारला गरज नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ते आरक्षण आधीच आम्हाला दिलेले आहे. केवळ त्याच्या अंमल बजावणीची मागणी आमची आहे. आता ते सुद्धा अंतिम टप्प्यात आले आहे. त्याच्या आडवे येणाऱ्यांना सोडायचे नाही. काही लांडगे आडवे येण्याची शक्यता आहे. त्यांनाही आडवे करत एस टी चा जातीचा दाखला मिळवायचा आहे. राज्यातील सर्व भटके विमुक्त जाती जमाती यांचा मोठा भाऊ म्हणून धनगर समाजाला पुढाकार घेवून सर्वांना न्याय द्यायचा आहे, असे आवाहन धनगर समाज नेते आ गोपीचंद पडळकर यांनी सिंधुदुर्गनगरी येथे बोलताना केले.
सिंधुदुर्गनगरी येथील मध्यामिक शिक्षक पतपेढी सभागृहात धनगर आरक्षण जागर यात्रा आ पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी शिवराज बीडकर, बाळा गोसावी, नवलराज काळे, राजेश जानकर, कानु शेळके, गंगाराम शिंदे, राधिका शेळके, दीपा ताटे, किशोर वरक, सुरेश झोरे, बाळा कोकरे, देऊ जंगले, संतोष साळसकर, अमोल जंगले, सुशील खरात, भरत गोरे आदी उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून आणि धनगर समाजातील महान व्यक्तींच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून जागर यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी शामसुंदर मोडक, किशोर वरक, नवलराज काळे, कानु शेळके यांनी विचार व्यक्त केले.
