उपद्रव टाळण्यासाठी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची मागणी
ओरोस ता १७
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माकडांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. यासाठी वन विभागाने माकडांचे निर्बीजीकरण करावे, अशी आपली मागणी असून तसे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार असल्याची माहिती ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेत ब्रिगेडियर सावंत यांनी ही मागणी केली. यावेळी पुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात भरभराट व आनंद प्राप्त होण्यासाठी मी समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाची स्थापना केली आहे. हा प्रकल्प विविध गावात राबविण्यात येत आहे. कृषि विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालयाच्या माध्यमातून या गावांमध्ये नैसर्गिक शेती, भरडधान्य लागवड अभियान व वृक्ष लागवड अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. यावर्षी ५०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती, २४ हेक्टर क्षेत्रावर भरडधान्य लागवड आणि २४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. हे कार्यक्रम राबविण्यात येणाऱ्या गावांना भेटी दिल्या. यामध्ये रानबांबूळी, अणाव, आवळेगाव, हिर्लोक, कुंदे, पोखरण, पडवे, पेंडुर, असगणी या गावांमध्ये जाऊन समृद्ध आणि आनंदी गाव अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा शेतक-यांकडून घेण्यात आला. या गावांमध्ये शेतकरी, ग्रामस्त, महिला व कृषि कार्यानुभवाचे आमच्या द्वारे नेमलेले कृषि दुत यांच्या सभा घेऊन शेतातील पिक प्रात्यक्षिकांची पाहणी केली. यावेळी शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणी या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी सर्व गावांमधील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये उद्भवणाऱ्या जंगली प्राण्यांच्या उपद्रवाबद्दल काय उपाययोजना करावी अशी विचारणा केली. सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये शासकीय वना बरोबरच खाजगी वनाचे क्षेत्र ८५% आहे. त्यामुळे जिल्ह्यात वन्य प्राण्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. हत्ती, माकड, डुक्कर, गवा रेडे, वनगाय, शेकरू, साळींदर या सारख्या वन्य प्राण्यांपासून शोतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांना योग्य नुकसानीचा योग्य मोबदला मिळत नाही व नुकसानीचे मोजमाप सुद्धा योग्य प्रकारे होत नाही, या उपद्रवी प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी आपली शेती मोठ्या प्रमाणात पड़ ठेवू लागले आहेत. सर्वच गावांमध्ये माकडांचा प्रादुर्भाव उपद्रव मोठ्या प्रमाणात होत असून मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस होते असे शेतकरी म्हणाले.
माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी व त्यावर ठोस उपाययोजना आखण्यासाठी यापूर्वी वनखात्यांच्या अधिकाऱ्यांसोबत दोन वेळा बैठका घेऊन चर्चा केली. यामध्ये माकडांची संख्या कमी करणे व त्यांचा शेतीतील उपद्रव कमी करणेसाठी सरकारी यंत्रणेद्वारे माकडांना पकडून त्यांची नसबंदी करणे आणि पकडलेल्या माकडांना सहयाद्रीच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे हा पर्याय मी सूचित केला होता. त्यासाठी मी सरकारकडे खास पाठपुरावा करत आहे. तसेच वन्य प्राण्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी सौर कुंपन करणे गरजेचे माहे. सोलार कुंपन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वन विभाग व कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस यांच्याकडे संपर्क साधावा.
कृषि विज्ञान केंद्र व छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय द्वारे यावर्षी २४ हेक्टर क्षेत्रावर भरडधान्य पिक प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आली आहेत. तसेच गावा – गावात भरडधान्य लागवड शेतकऱ्यांच्या शेतात केली आहे. यामध्ये नाचणी, वरी, सावा, हरीक या भरडधान्य पिकांची प्रात्यक्षिक प्राधान्याने घेण्यात आली आहेत. तसेच नागरीकांनी आपल्या दैनंदीन आहारात वापरण्यासाठी गावोगावी भरडधान्य पाककला स्पर्धा घेऊन व माहिती केंद्रा द्वारे याची माहीती आम्ही नेमलेल्या शास्त्रज्ञ कृषि दुत गावात शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना देत आहेत, असेही यावेळी ब्रिगेडियर म्हणाले.
