संदेश पारकर:महाराष्ट्रातील शिवसेना देवगडच्या शिवसैनिकांच्या पाठीशी उभी करणार
⚡कणकवली ता.१०-: कणकवली देवगडचे आमदार नितेश राणे यांना सत्ता आणि पैशाचा माज आला आहे. सरकारी रुग्णालयाच्या दुरावस्थेचा जाब विचारणाऱ्या शिवसैनिकांना मारहाण करण्याचा प्रयत्न त्या माजातून झाला आहे. कोकणात कुणाचाही माज जास्त काळ चालत नाही. माज आणि मस्तीचे परिणाम काय होतात, ते राणे यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये अनुभवले आहे. २०२४ मध्ये कणकवलीत त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी लगावला आहे.
भारतात लोकशाही आहे. जनतेचे प्रश्न मांडणे हे प्रत्येक राजकीय पक्षाचे काम आहे. आमच्या शिवसैनिकांनी ते काम केले. नांदेडसारखी घटना आमच्या देवगड, कणकवली किंवा सिंधुदुर्गात घडू नये, अशी आमची भूमिका आहे. आणि ती जनहिताची आहे. मात्र जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या शिवसैनिकांना नितेश राणे यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. आमदार स्वतः आमच्या शिवसैनिकाला खेचून गाडीत घेऊन जात होते. आमदारांच्या सुरक्षा रक्षकांची दांडगाई सुरु होती. आणि पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. सिंधुदुर्ग मागास होत असल्याचे हे निदर्शक आहे. आणि शिवसेना तसे कधीही घडू देणार नाही, हे सर्वांनी नीट लक्षात ठेवावे.
या प्रकाराच्या संदर्भात पोलिसांनी जी भूमिका घेतली, ती संशयास्पद आहे.पोलीस निरीक्षक यांच्यासमोरच देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार महोदयावर गुन्हा दाखल का नाही? याचा जाब आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना विचारणार आहोत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःच्या खात्याच्या शिस्तीचा टेंभा मिरवीत असतात. मात्र देवगडमध्ये त्यांच्या खात्याची अब्रू धुळीस मिळवली आहे. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तर असे शेकडो गणेश गावकर गावागावात तयार होतील आणि कामाचा जाब विचारतील, हे लक्षात ठेवावे.
जनतेचे प्रश्न आमदारासमोर मांडायचे नाहीत तर काय अमेरिकेच्या अध्यक्षासमोर मांडायचे? हे राणे यांनी स्पष्ट करावे. जनतेचा आवाज उठवणाऱ्या शिवसैनिकांना झालेली मारहाण आम्ही कदापिही सहन करणार नाही. उभ्या महाराष्ट्रातील शिवसेना आम्ही देवगडच्या शिवसैनिकांच्या पाठीशी उभी करू. राज्यभरात रान उठवू.
आमच्या देवगडला समंजस नेतृत्वाची परंपरा आहे. आप्पासाहेब गोगटे, अमृतराव राणे अशा सुसंस्कृत लोकांनी देवगडचे प्रतिनिधित्व केले आहे. आम्हाला त्या आमदारांचा अभिमान आहे. मात्र नितेश राणे यांनी त्या गौरवशाली परंपरेला डाग लावला आहे. शांतताप्रिय देवगड तालुक्यातील जनतेने हे लक्षात घ्यावे. गुंडगिरीचा अंगीकार केलेल्या भाजपला निवडणुकीत धडा शिकवावा. आजपर्यंत देवगडमध्ये जे कधीही घडले नाही, ते नितेश राणे यांनी पोलिसांच्या समोरच करून दाखवले आहे. हा सत्तेचा आणि पैशाचा माज आहे. आणि तो जनताच उतरवणार आहे, हा आमचा विश्वास आहे.
२०११ साली असाच माज नितेश राणे यांनी वेंगुर्ल्यात केला होता. आज १० वर्षानंतर देवगडमध्ये त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. कालच्या प्रकाराने नितेश राणे यांनी आपल्या कारकिर्दीच्या अस्ताची सुरुवात केली आहे.असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सांगितले.
