पोलीस निरीक्षक काळे यांचा उपक्रम:
ज्येष्ठांचाही केला सन्मान..
बांदा/प्रतिनिधी
स्वच्छ भारत अभियानात केवळ स्वच्छता करून न थांबता बांदा पोलीस निरीक्षक श्यामराव काळे यांनी शहरातील स्वच्छता दूत असलेले ग्रामपंचायत कर्मचारी यांचा प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन गुलाबपुष्प देऊन आभार व्यक्त केलेत. तसेच ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ्यांच्या घरी जात त्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्यात. पोलिसांच्या या कृतीने स्वच्छता कर्मचारी भारावून गेलेत.
आज देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी हे अभियान प्रभाविपणे राबविण्यात आले. बांदा पोलीस ठाण्याच्या परिसरात देखील पोलीस निरीक्षक श्यामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत स्वच्छता अभियान राबविले.
त्यानंतर बांदा ग्रामपंचायतचे स्वच्छता कर्मचारी यांना प्रत्यक्ष त्यांच्या कामाच्या ठिकाणी जातं पोलीस निरीक्षक काळे व उपनिरीक्षक भोसले यांनी गुलाबपुष्प देऊन कृतज्ञता व्यक्त केली. आज ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून बांदा शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेट देत त्यांना देखील शुभेच्छा देण्यात आल्या.
