रुग्णसेवेसाठी सुमारे ६० हजार रुपयांची मदत; गरजू रुग्णांना होणार लाभ..

⚡सावंतवाडी ता.२५-:
सावंतवाडी शहरातील गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून परिचित असलेले डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णसेवेसाठी सुमारे ६० हजार रुपये किमतीचे पाच नवीन फाउलर बेड देणगी स्वरूपात दिले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवेसोबतच विविध रुग्णोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले जाते. रुग्णसेवेसाठी संस्थेला फाउलर बेडची आवश्यकता होती. याबाबत संस्थेचे रवी जाधव यांनी डॉ. हर्ष सागावकर यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत डॉ. सागावकर यांनी दुसऱ्याच दिवशी संस्थेला पाच नवीन फाउलर बेड उपलब्ध करून दिले.
या बेडमुळे गरजू रुग्णांना संस्थेच्या माध्यमातून अधिक चांगली सेवा उपलब्ध होणार आहे. गरजू नागरिकांनी या रुग्णोपयोगी साहित्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे पदाधिकारी रवी जाधव, रूपा मुद्राळे, समीरा खलील व शेखर सुभेदार यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी डॉ. हर्ष सागावकर यांचे मनःपूर्वक आभार मानले. फाउलर बेड लोकार्पणप्रसंगी सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, शेखर सुभेदार, आमीन खलील व रवी जाधव उपस्थित होते.
