Headlines

‘सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करूया’…

विशाल परब:गणेशोत्सवाच्या पडद्यामागील सेवाव्रतींचा नागरी सत्कार..

⚡सावंतवाडी ता.२५-: कोकणची संस्कृती आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते आहे. गणेशोत्सव भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पडद्यामागे राहून निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील सेवाव्रतींचा सावंतवाडी नागरी कृती समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला.

‘श्री गणेशोत्सव २०२६’ निमित्त आयोजित या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते गणेश मूर्तिकार, भजनी मंडळांचे कलाकार, गायक, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, डेकोरेटर्स तसेच गणेशोत्सवाची शोभा वाढविण्यासाठी योगदान देणाऱ्या विविध घटकांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, “गणेशोत्सवाच्या भव्यतेमागे अनेक हातांचे कष्ट, भक्ती आणि समर्पण दडलेले असते. या सेवाव्रतींचा सन्मान करून सावंतवाडी नागरी कृती समितीने त्यांच्या पाठीवर कौतुकाची व शाबासकीची थाप दिली आहे. समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम प्रेरणादायी आहे. सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करूया,” असे आवाहन त्यांनी केले.
“कोकण आणि गणेशोत्सवाचे नाते केवळ श्रद्धेचे नाही, तर संस्कृती, कला आणि सामाजिक एकोप्याचे आहे. गणेशोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी मूर्तिकारांपासून सफाई कामगारांपर्यंत असंख्य हात निःस्वार्थपणे झटत असतात. अशा सेवाव्रतींचा सन्मान म्हणजे त्यांच्या कष्टांना आणि समर्पणाला केलेला मानाचा मुजरा आहे,” असेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास नगरसेविका दिपाली भालेकर, युवा मोर्चा अध्यक्ष नितीन नाईक, माजी नगरसेवक कीर्ती बोंद्रे, नगरसेवक अजय गोंदावळे, मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष बापू सावन, ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, नगरसेविका दिव्या सूर्याजी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सावंतवाडी नागरी कृती समितीचे अध्यक्ष सुनील पेडणेकर, उपाध्यक्ष ॲड. राजू कासकर, सरचिटणीस श्रीपाद सावंत तसेच समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page