Headlines

नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी सुबत्ता माळी हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

कणकवली / प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या नोकरीत लावतो असे आमिष दाखवून सुमारे १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी असलेली सुबत्ता गिरीष माळी (पुर्वाश्रमीची सुबत्ता सदानंद वारंग, रा. करूळ) हीचा अटकपूर्व जामिन अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. टी. त्रिपाठी यांनी फेटाळून लावला. सरकार पक्षातर्फे अॅङ आर. व्ही. देसाई व फिर्यादी सुनिल धुरे यांच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तसेच मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे ऑफ इंडिया येथे नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून पाच जणांकडून प्रत्येकी २४ लाख घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात दाखल आहे. सुनील दामोदर धुरे (रा. कलमठ गावडेवाडी) यांच्या फिर्यादीनुसार सुबत्ता माळी, विनिता विवेक मुंज (रा. कणकवली) आणि मनोजकुमार जैन (रा. वाशीम), भागवत यादव, उमेष घोष, जनकराम यादव व निरज श्रीवास्तव यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी सुबत्ता माळी हिने अटकपूर्व जामीन मंजूर होण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता,

फिर्यादी श्री. धुरे यांची पत्नी आरोग्य खात्यात काम करत असल्याने, तीच्यासोबत काम करणारी विनीता मुंज हीने मुलांना केंद्र सरकारची नोकरी मिळणेबाबत आपल्याकडे ओळखी आहेत, असे सांगून प्रत्येकी २४ लाख रोख घेतले होते. फिर्यादीची मुले सिद्धेश व माधुरी धुरे तसेच तन्वी म्हस्के व चैतन्य नाईक, निकीता दळवी यांनी प्रत्येकी २४ लाख प्रमाणे १ कोटी २० लाख एवढी रक्कम विनीता मुंज मार्फत सुबत्ता माळीकडे दिली होती.

सुनावणीत एवढ्या मोठ्या रकमेची फसवणूक हा संगनमताने गुन्हा केला असून केंद्र शासनाच्या बनावट दस्तऐवज व सील वापरून ती खरी असल्याचे भासवले आहे, याबाबत तपास करायचा आहे. आरोपी सुबत्ता माळी ही मौजे करूळ ता. कणकवली येथील असून तिने स्वतःच्या बँक खात्यावर आणि तिची आई सुनीता सदानंद वारंग हिच्या बँक खात्यावर फिर्यादी आणि साक्षीदार यांच्याकडून पैसे स्वीकारले असून ते पैसे कोणत्या उद्देशाने घेतले व त्याचा व्यवहार पुढे कसा झाला याचा तपास करायचा आहे, आरोपी सुबत्ता माळी हिने या रक्कमेतुन जंगम मालमत्ता घेतली असल्यास त्याचा तपास करणे, आरोपी सुबत्ता हिने स्वतः दिल्लीत उपस्थित राहून काही साक्षीदार मुलांकडून आवेदन फॉर्म भरून घेतले आहेत. तक्रारदार व साक्षीदार यांना दिलेली बनावट सहीची कागदपत्रे आणि बोगस अपॉईंटमेंट लेटर दस्तऐवज कोठे आणि कोणी तयार केले, याचा तपास करायचा आहे. यासह अन्य मुद्दे उपस्थित करत आरोपी सुबत्ता माळी हीचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यासाठी युक्तिवाद केला. त्यानुसार न्यायालयाने सुबत्ता माळी हीचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

You cannot copy content of this page