वामन खोत:भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये रानभाजी प्रदर्शन व पाककृती स्पर्धा संपन्न…
⚡मालवण ता.१२-: भारतीय संस्कृतीत रानभाज्यांचे महत्व अनन्यसाधारण असेच आहे ऋषीं मुनींच्या काळापासून रान भाज्यांचा आहारात वापर होत असून रान भाज्यांचे सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने पावसाळ्यात कोकणात सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचा रोजच्या आहारात उपयोग करून आपले आरोग्य निरोगी बनवावे असे प्रतिपादन मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व भंडारी हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक वामन खोत यांनी केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये आयबीटी विभागामार्फत आयोजित रानभाजी प्रदर्शन व पाककृती स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये विद्यार्थ्यांनी टायकूळ, अळू, श्रावण घेवडा, भारंगी, कुरडई आदी विविध प्रकारच्या रानभाज्या व त्यापासून बनवलेल्या पाककृती सादर केल्या होत्या. या पाककृतीचे परीक्षण माजी मुख्याध्यापक वामन खोत व शिक्षिका सौ. संजना सारंग यांनी केले.
या स्पर्धेत वैभव मंगेश करलकर (कुरडई शेंगाची भाजी) याने प्रथम क्रमांक पटकावीला. तर शौर्या मनोज कांबळी (भारंगीची भाजी) हिने द्वितीय व अश्विनी अनिरुद्ध बिरमोळे (टायकुळ्याची भजी) हिने तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी मुख्याध्यापक हणमंत तिवले यांनी विविध पाककृती बद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी आयबीटीचे शिक्षक नेहा गवंडे, दर्शना मयेकर, केशव भोगले, जगन्नाथ आंगणे आदी उपस्थित होते.
