⚡मालवण ता.०४-: मालवण वायरी रेकोबा घाटीजवळ एका विहिरीत पडलेल्या दोन लहान मुलांसह आईला वाचविणाऱ्या स्थानिक युवकांचा मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व इतर पोलीस अधिकाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला.
वायरी रेकोबा घाटी येथील एका विहिरीजवळ शुक्रवारी सायंकाळी मुले खेळत होती. यातील एका पाच वर्षीय मुलाने चुकून विहिरीत उडी घेतली. मुलगा विहिरीत पडल्याचे पाहून त्याच्या आईने तीन वर्षीय मुलासह विहिरीत उडी घेतली. हे दृश्य पाहून अन्य मुलांनी आरडाओरडा केला. त्यावेळी स्थानिक तरुणांनी धाव घेत विहिरीत उडी घेत तिघांनाही सुखरुप बाहेर काढले होते. या बचाव कार्यात सहभागी झालेल्या विशाल लुडबे, एकनाथ फणसेकर, वायरी भूतनाथ ग्रामपंचायत सदस्य तेजस लुडबे, ओंकार तळगांवकर, दीपक कुडाळकर, प्रसाद देऊलकर, राकेश लुडबे, वैभव खुरंदळे, राकेश भगत या तरुणांचा मालवण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत व अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
